
कर्जतच्या वादग्रस्त कोल्हारे ग्रामपंचायतीत रात्रीस खेळ सुरू असल्याचे समोर आले आहे. मिंधे गटाची सत्ता असलेल्या या ग्रामपंचायतीचे टाळे मध्यरात्री उघडून काहीतरी काळेभेरे सुरू असल्याची माहिती मिळताच काही जागरूक ग्रामस्थांनी याठिकाणी धाव घेतली. त्यामुळे दरवाजा उघडा टाकूनच हे कर्मचारी पाय लावून पळाले. दरम्यान इतक्या रात्री ग्रामपंचायत कार्यालय उघडलेच का, कोणती महत्त्वाची कागदपत्रे तर पळवली नाहीत ना, असा सवाल करण्यात येत असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
कर्जत तालुक्यात असलेली कोल्हारे ग्रामपंचायत नेहमीच या ना त्या कारणाने वादत राहिली आहे. या ग्रामपंचायतीवर मिंधे गटाची सत्ता असून एका इमारतीला ओसी दिल्यावरून सरपंच महेश विरले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी सुरू आहे. असे असतानाच २५ मार्चच्या मध्यरात्री कोल्हारे ग्रामपंचायत काही कर्मचाऱ्यांनी उघडल्याने उलटसुलट चर्चा सुरू आहे. दरम्यान ग्रामपंचायत कार्यालय उघडल्याची माहिती मिळताच काही जागरूक गावकऱ्यांनी या ठिकाणी धाव घेतली. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी कार्यालय उघडे ठेवूनच घटनास्थळावरून पळ काढला. यावरून ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला असून कोणाच्या परवानगीने परस्पर कार्यालय उघडले गेले. ग्रामसेवकाची परवानगी होती का. नेमके कोणते पुरावे नष्ट करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव होता. त्यासाठी कोणती कागदपत्रे पळवली, असा सवाल नागरिकांनी केला आहे.
कोणते पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न होता
एकीकडे कोल्हारे गावात सुसज्ज ग्रामपंचायत कार्यालय असताना सहा महिन्यांपूर्वी हे कार्यालय नेरळ कळंब येथे राज्य मार्गावरील खासगी सोसायटीमध्ये हलवण्यात आले आहे. यासाठी विनाकारण पैसे मोजावे लागत आहेत. त्यातच मध्यरात्री ग्रामपंचायत कार्यालय उघडल्याने नेमके कोणते पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न होता, असा प्रश्न विचारला जात आहे