
मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत. अशा प्रकारची निकृष्ट दर्जाची कामे भविष्यात होऊ नयेत, रस्त्यांना तडे जाऊ नयेत यासाठी समन्वय आणि सर्व कामांवर देखरेख करण्यासाठी आता आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली.
अंधेरीमधील लोखंडवाला परिसरातील अच्युतराव पटवर्धन रस्ता आणि सांताक्रुझमधील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून या प्रकरणी कंत्राटदार आणि गुणवत्ता संस्थेवर काय कारवाई केली, असा सवाल प्रश्नोत्तराच्या वेळी विधान परिषदेत सदस्य प्रसाद लाड यांनी केला. त्याला उद्योगमंत्र्यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, मुंबईतील रस्ते काँक्रिटीकरणासंदर्भात विधानसभेच्या अध्यक्षांच्या दालनात सोमवारी एक बैठक झाली. त्यात मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे होऊ नये यासाठी देखरेखीसाठी आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यास उपस्थित 27 आमदारांनी संमती दिली आहे.
4 कंत्राटदारांवर कारवाई
निविदेतील अटी आणि शर्तीनुसार, निकृष्ट दर्जाची कामे तोडून टाकून नव्याने करणे आणि कामाच्या किमतीइतका दंड आकारण्याची तरतूद आहे. अशा प्रकारे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या मुंबईतील 4 कंत्राटदारांवर कारवाई करण्यात आली आहे. या कंत्राटदारांकडून करण्यात आलेल्या 3 लाख 27 हजार 450 चौ. मीटरपैकी 1305 चौ. मी. क्षेत्रफळाच्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामात तडे असल्याचे आढळले. त्यानुसार ही कामे त्यांच्याकडून नव्याने करून घेण्यात आली. या निकृष्ट कामाच्या दुप्पट म्हणजेच 3 कोटी 37 लाख इतका दंड कंत्राटदाराला आणि 3 कोटी 37 लाख इतका दंड गुणवत्ता व्यवस्थापन संस्थेलाही करण्यात आला आहे, असे उत्तर सरकारकडून देण्यात आले.