
स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सादर केलेल्या विडंबन गीतानंतर मिंधे गटाच्या कार्यकर्त्यांनी खारच्या युनिकॉन्टिनेन्टल हॉटेलमध्ये तोडफोड केली. या तोडफोडीप्रकरणी खार पोलिसांनी शिंदे गटाचे राहुल कनाल व कुणाल सरमळकर यांच्यासह 20 जणांना ताब्यात घेतले आहे.
कुणाल कामरा याचा खारच्या युनिकॉन्टिनेन्टल हॉटेलमध्ये कॉमेडी शो झाला होता. या शोमध्ये त्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता विडंबन गीतातून त्यांची सालटी काढली. तसेच या गहीतातून त्याने गद्दारांच्या चौर्यकर्माचीही कुणाल कामराने चांगलीच टर उडवली. कुणाल कामराने विडंबन गीतातून केलेली हजामत मिंधेंना चांगलीच झोंबली आणि त्यांनी कुणाल कामराच्या शोच्या सेटची तोडफोड केली. जवळपास 40 ते 50 मिंधे गटाच्या कार्यकर्त्यांनी युनिकॉन्टिनेन्टल हॉटेलमधील शोच्या सेटवर धुडगुस घातला.