राज्याच्या भूजलात विषारी नायट्रेटचे प्रमाण वाढले, सात जिल्ह्यांमध्ये प्रमाण जास्त

राज्याच्या भूजलात विषारी नायट्रेटचे प्रमाण वाढले असून त्यात वर्धा, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, नांदेड, बीड आणि जळगाव या सात जिल्ह्यात प्रमाण जास्त असल्याची धक्कादायक माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधान परिषदेत लेखी उत्तरात दिली.

विधान परिषदेत सदस्य मिलिंद नार्वेकर, सुनील शिंदे यांनी केंद्रीय भूजल मंडळाच्या ’वार्षिक भूजल गुणवत्ता अहवाल 2024’ मध्ये राज्यातील 7 जिल्ह्यातील भूजलात नायट्रेट असल्याचे म्हटले आहे. सरकारने केलेल्या भूजल तपासणीत काय आढळले, त्या जिल्ह्यातील जनतेला शुध्द पिण्यायोग्य पाणी उपलब्ध करून देण्याबाबत कोणती उपाययोजना केली आहे, असे तारांकित प्रश्न विचारले आहेत. त्यावर दिलेल्या लेखी उत्तरात मंत्री पाटील यांनी ही बाब खरी असल्याची कबुली दिली.

– केंद्राच्या भूजल मंडळामार्फत 2024 च्या भूजलातील पाणी पातळी व पाणी गुणवत्ता तपासणीमध्ये राज्यातील एकूण 1,567 ठिकाणांच्या पाणी नमुन्यांपैकी 560 पाणी नमुने विषारी नायट्रेट बाधित आढळून आले आहेत. तर, राज्य शासनाच्या भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणेच्या 2024-25 च्या पाणी नमुने तपासणीनुसार 29,414 पाणी नमुन्यांपैकी 3,418 पाणी नमुने नायट्रेट बाधित असल्याचे आढळून आले आहेत.

– नायट्रेटयुक्त रासायनिक खते, औषधांचा अतिवापर, औद्योगिक, शहरी प्रदूषण, जमीन वापरातील बदल, जंगलतोड, वायुप्रदूषण, भूगर्भातील बदल, सांडपाण्याचे गैरव्यवस्थापन अशा कारणांमुळे पाणी स्रोतामध्ये नायट्रेटचे प्रमाण वाढत असल्याचे अहवालात आढळले आहे, असे मंत्री पाटील यांनी म्हटले आहे.