‘समृद्धी’वरील प्रवास 20 टक्क्यांनी महागणार

‘मुंबई- पुणे एक्सप्रेस वे’पाठोपाठ आता मुंबई व नागपूरला जोडणाऱया समृद्धी महामार्गाचा प्रवास महागणार आहे. विशेष म्हणजे हा महामार्ग अद्याप पूर्णपणे खुला झालेला नाही. त्याआधीच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने तब्बल 20 टक्क्यांपर्यंत टोल दरवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या मंगळवार, 1 एप्रिलपासून सुधारित दराने टोलवसुली केली जाणार आहे.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी एक्प्रेस वेवर वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. मुंबई आणि नागपूरचे अंतर कमी कालावधीत कापले जात आहे. वाहनधारकांच्या वाढत्या पसंतीचा कल लक्षात घेत एमएसआरडीसीने महामार्ग पूर्णपणे खुला होण्याआधीच टोल दरवाढीचा भार माथी मारण्याचा निर्णय घेतला आहे.

नवीन टोल दर

हलक्या मोटार वाहनांसाठी 2.06 रुपये, हलक्या मोटार व्यावसायिक वाहने- 3.32 रुपये, 2 एक्सल जड वाहने – 6.97 रुपये, 3 एक्सल जड वाहने- 7.60 रुपये, अवजड बांधकाम यंत्रसामग्री- 10.93 रुपये तसेच 7 वा त्याहून अधिक एक्सलच्या वाहनांवर 13.30 रुपये इतका प्रतिकिमी टोल दर आकारला जाणार आहे.