
औरंगजेबाच्या कबरीवरून नागपूरमध्ये उसळलेली दंगल नियंत्रणात आली असली तरी तणाव असल्यामुळे सहा भागांत संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे. शिवाय संवेदनशील भागात पोलिसांचा कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आगामी गुढीपाडवा सण आणि रमजानच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येत आहे.
दंगलग्रस्त भागात संचारबंदी लावण्यात आल्यामुळे पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यावर निर्बंध आहेत. त्यामुळे आज पोलिसांच्या आवाहनानुसार मशिदींमध्येही अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत नमाज अदा करण्यात आली. शांतता राहावी यासाठी स्थानिक पोलीस, राज्य राखीव पोलीस दल आणि नागपूर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
आतापर्यंत 100 अटकेत
नागपूरमध्ये 17 मार्च रोजी झालेल्या हिंसाचाराच्या संदर्भात नागपूर पोलिसांनी आणखी नऊ जणांना अटक केली, त्यामुळे अटक झालेल्यांची एकूण संख्या 100 हून अधिक झाली आहे. याव्यतिरिक्त, स्थानिक पोलिस ठाण्यांनीही सीसीटीव्ही व्हिडिओंच्या आधारे अटक मोहीम सुरू केली आहे.