मुंबईचे सर्व संघ बाद फेरीत

72 व्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी मुंबई शहर पूर्व संघाने जळगाव जिह्याचा 51-24 असा धुक्वा उडवत पुरुष गटाच्या बाद फेरीत धडक मारली. एवढेच नव्हे तर मुंबई आणि मुंबई उपनगरच्या सर्वच्या सर्व चारही संघांनी साखळीतील दमदार विजयांसह बाद फेरी गाठली आहे. आता शनिवारी बाद फेरीचे सर्व सामने खेळविले जाणार असून महिला आणि पुरुषांचे 16-16 संघ बाद फेरीत भिडतील.

महाराष्ट्रातील कबड्डीची श्रीमंती दाखवणाऱ्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेत मुंबई शहरच्या पश्चिम आणि पूर्व संघाने आज दमदार विजयांची नोंद केली. मुंबई शहरच्या पूर्व संघाने ‘ह’ गटात जळगाव जिह्याची धूळधाण उडवत 51-24 असा विजय मिळवला. या विजयामुळे पूर्व संघाने अक्वल स्थानासह बाद फेरी गाठली.  पुरुषांच्या गटात शहरच्या दोन्ही संघांसह मुंबई उपनगरच्याही पूर्व आणि पश्चिम संघाने आपली विजयी आगेकूच कायम राखली. तसेच पुणे, ठाणे यांचे दोन्ही संघ बाद फेरीत पोहोचले. त्याचबरोबर रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर, नाशिक आणि अहिल्यानगरच्या संघांनीही बाद फेरीचा टप्पा गाठला. पुरुषांप्रमाणे महिलांच्या गटातही मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे आणि ठाणे यांच्या सर्व संघांनी बाद फेरीत स्थान मिळवले असून आता उपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी त्यांना उपउपांत्यपूर्व फेरीत विजयी पताका फडकवावी लागणार आहे.