मालिका वाचवणारा पाकिस्तानचा विजय

सततच्या पराभवामुळे माजी क्रिकेटपटूंसह क्रिकेटप्रेमींच्या टीकेचा सामना करणाऱ्या पाकिस्तानच्या संघाला अखेर विजयाचा सूर गवसला. न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक टी-20 सामन्यात हसन नवाजने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तानने ऐतिहासिक विजय मिळवत मालिका जिवंत ठेवली आहे. नवाजच्या शतकी तडाख्यामुळे 16 षटकांतच 205 धावांचा आव्हान गाठण्यात पाकिस्तान यशस्वी झाला आहे. पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंड 2-1 ने आघाडीवर आहे.

तिसऱ्या टी-20 सामन्यात नाणेफेक जिंकून पाकिस्तानने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. पहिल्याच षटकात फिन अॅलन शून्यावर बाद झाला. यानंतर मार्क चॅपमनने न्यूझीलंडचा डाव सावरला. तुफानी फलंदाजी करत चॅपमनने 44 चेंडूत 11 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 94 धावांची खेळी केली. मायकेल ब्रेसवेलने 18 चेंडूंत 3 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 31 धावांची खेळी केली. त्यांच्या खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने 200 धावांचा टप्पा ओलांडला. पाकिस्तानच्या हारिस रऊफने तीन, तर शाहिन आफ्रिदी, अबरार अहमद, अब्बास आफ्रिदी यांनी प्रत्येकी दोन विकेट टिपले.

205 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानने तुफानी सुरुवात केली. हसन नवाजने 45 चेंडूंत 10 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने नाबाद 105 धावांची खेळी केली. नवाजव्यतिरिक्त कर्णधार सलमान आगाने 31 चेंडूंत 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 51 धावांची खेळी केली. हा सामन्यात पाकिस्तानने 9 विकेट राखून विजय मिळवला.