
नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग (आयएमएल) स्पर्धेत हिंदुस्थानने विजेतेपदाची हॅटट्रिक साजरी केली. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने या यशाचे श्रेय उत्कृष्ट नियोजन आणि सांघिक कामगिरीला दिले आहे. ही एक मोठी कामगिरी आहे. चांगले टीमवर्क, योग्य नियोजन आणि ते यशस्वीरीत्या राबविल्यामुळेच सलग तीन वेळा ही स्पर्धा जिंकू शकलो याचा खूप आनंद आहे, असेही सचिन म्हणाला. रायपूर येथे आयएमएलच्या झालेल्या अंतिम सामन्यात इंडियन मास्टर्सने वेस्ट इंडीज मास्टर्सचा सहा विकेट्सने पराभव केला होता. या सामन्यात अंबाती रायुडूने 74 धावांची तुफानी खेळी केली होती, तर विनय कुमारने तीन गडी बाद केले होते. या विजयाबाबत सचिन म्हणाला, आम्ही सर्वांनी काही काळापूर्वी सक्रिय क्रिकेट खेळणे थांबवले होते, पण नवीन पिढीशी तसेच खेळाचा आनंद घेणाऱयाशी पुन्हा जोडले जाणे खूप आनंददायी होते. ही स्पर्धा सांघिक कामगिरीच्या जोरावर खेळली गेल्याने आम्ही यश मिळवू शकलो. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात युसूफ पठाणच्या आक्रमक फलंदाजीमुळे आम्ही मोठी धावसंख्या उभारू शकलो. इरफानने संगक्काराचा महत्त्वाचा विकेट घेतला, ते कलाटणी देणारे ठरले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात युवराज सिंगने शानदार फलंदाजी केली.