
संसदेच्या सर्वोच्च सभागृहात आज काय दिवस आले आहेत. गृहमंत्रालयावर चर्चा करताना औरंगजेबाच्या मुद्द्यावर चर्चा करत आहेत. त्यास आपलं गृहमंत्रालय जबाबदार आहे. शांतताप्रिय नागपूरमध्ये आज दंगे होत आहेत. ‘नई लाशे बिछाने के लिए गढे मुर्दे आपने उखाड दिये, और वो औरंगजेब के नाम पर…’, अशा शब्दांत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेत नागपूर हिंसाचार आणि औरंगजेब कबरीच्या वादावरून केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
देशातील ढासळत्या कायदा व सुव्यवस्थेवरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्रालयाच्या कारभाराचे वाभाडे काढले. सतत औरंगजेबाचे नाव घेऊन देशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न काही शक्ती करत आहेत. त्यात काही लोक असे आहेत, जे महाराष्ट्रात मंत्री आहेत, जे केंद्रात उच्च पदांवर आहेत. त्यांना आपण रोखलं नाही तर देश अखंड राहणार नाही, असे संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या समक्षच ठणकावून सांगितले.
- कालपर्यंत मणिपूर हिंसाचारात जळत होतं. आता महाराष्ट्रही होरपळत आहे. नागपूरमध्ये 300 वर्षांत कधी दंगा झाला नव्हता. हा नागपूरचा इतिहास आहे. नागपूरसारख्या शहरात दंगा होतो, तोही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात, असे खडे बोल संजय राऊत यांनी सुनावले.
देशाला पोलीस स्टेट बनवले
देशात एकता आणि अखंडता कायम राखणे आणि सुरक्षितता राखण्याचे काम हे गृहमंत्रालयाचे आहे; पण गेल्या काही वर्षांपासून या देशाला पोलीस स्टेट बनवले आहे. विरोधकांना दुबळं करणं, राजकीय पक्ष फोडणे, आमदार-खासदारांना विकत घेण्यासाठी पोलिसांची मदत घेणे, अशी कामे देशात प्रत्येक ठिकाणी गृहमंत्रालयाच्या माध्यमातून सुरू आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
औरंगजेब मुद्द्यावरून गरीबांची माथी भडकवण्याचे काम
तुम्हाला औरंगजेबाची कबर तोडायची आहे तर बेधडक तोडा, तुम्हाला कोणी अडवलं आहे. केंद्रात आणि महाराष्ट्रात तुमचंच सरकार आहे. गृहमंत्री तुमचे आहेत, महाराष्ट्रात मुख्यमंत्री तुमचेच आहेत. हातात फावडे घेऊन जा आणि तोडा. पण तुमच्या मुलांना पाठवा, आमच्या मुलांना पाठवू नका. तुमची मुलं विदेशात शिकत आहेत. विदेशात काम करत आहेत. आणि जी गरीब मुलं आहेत त्यांची माथी भडकवण्याचं काम तुम्ही करत आहात, असा टोला संजय राऊत यांनी सत्ताधाऱयांना लगावला.