धनंजय मुंडेंकडून मिळणारी पोटगी पुरेशी नाही! करुणा मुंडेंचा न्यायालयात अर्ज

घरगुती हिंसाचार प्रकरणी कौटुंबिक न्यायालयाने दोषी ठरवलेल्या अजित पवार गटाचे नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून मिळणारी पोटगी पुरेशी नाही, असा दावा करत करुणा मुंडे यांनी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. पोटगीविरोधात धनंजय मुंडे यांनी सत्र न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर 29 मार्च रोजी सुनावणी होणार आहे.

वांद्रय़ाच्या कौटुंबिक न्यायालयाने माजी कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांना दणका देत घरगुती हिंसाचार प्रकरणात प्रथमदर्शनी दोषी ठरवले होते तसेच पत्नी करुणा यांनी केलेले आरोप सकृत्दर्शनी मान्य करत मुंडे यांना पत्नीला 1 लाख 25 हजारांची पोटगी व मुलगी शिवानी हिला 75 हजार रुपये दरमहा देण्याचे आदेश दिले होते. मुंडे यांनी हे आरोप फेटाळून लावत पत्नी व मुलीला दरमहा पोटगी देण्यास नकार दिला आहे. वांद्रे कौटुंबिक न्यायालयाच्या निकालाविरोधात मुंडे यांनी सत्र न्यायालयात अॅड. सायली सावंत यांच्यामार्फत याचिका दाखल केली असून, कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्याचबरोबर खटला निकाली निघत नाही तोपर्यंत पोटगी देण्याच्या आदेशाला स्थगिती देण्याची मागणी मुंडे यांनी याचिकेतून केली आहे. आज शुक्रवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश शेख अकबर शेख जाफर यांच्यासमोर या याचिकेवर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी धनंजय मुंडे यांच्याकडून मिळणारी पोटगी पुरेशी नाही. प्रत्येकी तीन लाखप्रमाणे नऊ लाख रुपये पोटगी देण्याची मागणी करुणा यांनी न्यायालयात अर्जाद्वारे केली. तसेच धनंजय मुंडे यांच्या याचिकेला उत्तर देण्यासाठी करुणा यांच्या वकिलांनी वेळ मागितला. न्यायालयाने हा अवधी देत या प्रकरणावरील सुनावणी 29 मार्च रोजी ठेवली.