पादचारी पूल पूर्ण होईपर्यंत शीव पूल पाडणार नाही! रहिवाशांच्या मागणीनंतर मध्य रेल्वे प्रशासनाचा निर्णय

धारावीतील शाळकरी मुले आणि पादचाऱ्यांच्या सोयीसाठी पादचारी पूल बांधला जात नाही तोपर्यंत शीव पूल पूर्णपणे पाडणार नसल्याचे मध्य रेल्वेने जाहीर केले आहे. पादचाऱ्यांना पर्यायी मार्ग उपलब्ध करेपर्यंत शीव पुलाचे पाडकाम करण्यास स्थानिक रहिवाशांनी तीव्र विरोध केला होता. रहिवाशांच्या मागणीची दखल घेत पादचारी पुलाचे बांधकाम होईपर्यंत शीव पूल पूर्णपणे न पाडण्याचा निर्णय घेतला आहे.

ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे आणि लालबहाद्दूर शास्त्राr मार्गाला जोडणारा 110 वर्षांचा जुना शीव पूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचे जाहीर करण्यात आले होते. 2020 मध्ये आयआयटीच्या ऑडिट रिपोर्टमधून पुलाबाबत धोक्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार मध्य रेल्वे आणि मुंबई महापालिकेमार्फत संयुक्तरीत्या पुलाचे पुनर्बांधकाम केले जाणार आहे. मात्र आधी पादचाऱ्यांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्या, नंतरच पुलाचे पाडकाम करा, अशी मागणी रहिवाशांनी केली. त्याची दखल घेत मध्य रेल्वेने पादचारी पुलाचे बांधकाम होईपर्यंत शीव पूल पूर्णपणे न पडण्याचा निर्णय घेतला आहे. पादचारी पूल सुरू होईपर्यंत पश्चिमेकडे जाणारी मार्गिका ‘जैसे थे’ राहील. सध्याच्या रस्ते पुलाच्या जागी 56 मीटर लांब व 3 मीटर रुंद फुटओव्हर पूल बनवण्याची योजना आखली जात आहे, असे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

n नवीन पूल सध्याच्या ब्रिटिशकालीन पुलाच्या दक्षिण टोकाला बांधण्यात येणार आहे. महापालिकेने 99 वर्षांच्या भाडेतत्त्वावर घेतलेली 120 चौरस मीटर जमीन नवीन पुलाच्या बांधकामासाठी आवश्यक आहे. सध्याच्या 40 मीटरच्या रेल्वे पुलाचा 51 मीटरपर्यंत विस्तार करण्यात येणार आहे. शीव रेल्वे स्थानकाजवळील या पुलाच्या पुनर्बांधकामासाठी दीड वर्षाचा अवधी देण्यात आला आहे. या परिसरातील नागरिकांना सध्या वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे.