राज्यात AI मुळे बेरोजगारी वाढू शकते, विधानपरिषदेत शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य

राज्यात एआयमुळे (AI) मुळे बेरोजगारी वाढू शकते, अशी चिंता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी विधानपरिषदेत व्यक्त केली आहे. केंद्र सरकारकडून देशाचे एआय धोरण तयार करण्यात येत आहे. त्याच धर्तीवर त्याला सुसंगत असे राज्याचे स्वतंत्र एआय धोरण तयार करण्यात येत आहे. याचसंदर्भात विधानपरिषदेत बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले की, “एआयच्या संदर्भात महाराष्ट्र शासनाने अधिक लक्ष घालावे. एआयचं चांगले आणि वाईट अशा प्रकारे दोन्ही फायदे आहेत. एआयमुळे रोजगाराच्या बाबतीत देखील प्रश्न भविष्यकाळात उभा राहू शकतो. सध्याच्या काळात आयटी क्षेत्रात रोजगार उपलब्ध करणे फार मोठं कठीण आहे आणि या आयटी क्षेत्रात बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

ते म्हणाले, “भविष्यकाळामध्ये युवकांच्या बुद्धिमत्तेला मोठ्या प्रमाणात आव्हान असेल. जो युवक बुद्धिमत्तेमध्ये तज्ञ असेल त्याच युवकाला भविष्यकाळामध्ये रोजगाराच्या संदर्भात संधी निर्माण होईल. आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्याने आधुनिक पद्धतीला चालना दिल्याने त्या राज्यातील युवक कौशल्य विकासमध्ये प्रगती करत आहेत. मात्र या ठिकाणी राज्य सरकार कमी पडत आहे, यामुळे आपले विद्यार्थी विकास आणि कौशल्य यामध्ये मागे राहत आहेत. राज्यात एआयमुळे बेरोजगारीची संख्या वाढू शकते. एआयमुळे निर्माण होणाऱ्या नोकऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील मुलांना प्रथम प्राधान्य द्यावे लागेल. अन्यथा महाराष्ट्रामध्ये बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड वाढेल. हल्लीचे विद्यार्थी प्रचंड स्मार्ट आहेत; एआयचा वापर चुकीच्या पद्धतीने होऊ नये यासाठी सरकारने कडक कायदे करावे. राज्य सरकारने एआयबद्दल धोरणात्मक विचार करून त्या संदर्भात योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी आमदार शशिकांत शिंदे यांनी सभागृहात केली.”