
>> प्रशांत गौतम
मराठवाड्याचे गौरव गीत लिहिणारे ज्येष्ठ कवी लक्ष्मीकांत तांबोळी यांना गुजरात राज्याचे राज्यगीत लिहिणारे कवी नर्मद यांच्या नावाचा गुजरात साहित्य अकादमीचा पुरस्कार शुक्रवारी प्रदान करण्यात आला. मराठी व गुजराती या भाषाभगिनीत एक चांगला व वेगळाच योग या पुरस्काराच्या निमित्ताने जुळून आला असे म्हणावे लागेल. प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी यांचे नाव समोर आले की, त्यांच्या ‘दूर गेलेले घर’, ‘कृष्णकमळ’ या कादंबऱया आठवतात. ‘गोकुळवाटा’ या कार्यक्रमाचीही आठवण होते. एवढेच नाही तर मराठवाडय़ाचे गौरव गीत कानात घुमते. छत्रपती संभाजीनगर या शहरावर त्यांची एक कविता फार लोकप्रिय आहे, ती कविताही आठवते. शालेय पाठय़पुस्तकात असलेला ‘सैनिकाचे रक्त’ हा धडाही आठवतो. अशा या सिध्दहस्त लेखणीचा होणारा हा सन्मान अभिमानास्पद असाच आहे. कथा, कविता, कादंबरी, ललित लेखन अशा विविध प्रांतात त्यांनी आपल्या भाषाशैलीची एक छाप सोडली आहे. मराठी भाषेतील मनस्वी लेखक अशी त्यांची ओळख आहे. त्यांचा कवितेतून चिंतनशीलतेचा प्रत्यय येतो. कवितासंग्रह – अस्वस्थ सूर्यास्त (1970), गोकुळवाटा (2004), जन्मझुला (2013), मी धात्री मी धरित्री (1991, 2003), हुंकार (1959) कथासंग्रह – तवंग (1968), सलाम साब (1981) कादंबऱया कृष्णकमळ (1975), गंधकाली (1979), दूर गेलेले घर (1970, 1985, 1997), ललित लेखसंग्रह – कबिराचा शेला (1996), झिरपा (2008), सयसावल्या (2006) समीक्षा – काव्यवृत्ती आणि प्रवृत्ती (1993), संकीर्ण – मार्ग हा सुखाचा (प्रौढ साक्षरांसाठी)अशी ग्रंथ संपदा त्यांच्या नावावर आहे. विविध अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने, मराठवाडा साहित्य संमेलन, आकाशवाणी केंद्रावरील काव्यवाचन, हा प्रवास तर प्रदीर्घ काळापासूनचा आहे. मानवत येथे झालेल्या 21 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे त्यांनी अध्यक्षपद भूषवले. तसेच शब्दशिल्प मेळावा, लातूर. परभणी जिल्हा साहित्य संमेलन, कुरुंदकर स्मृति साहित्य संमेलन, नांदेड, ग्रामीण साहित्य संमेलन या संमेलनाचेही त्यांनी अध्यक्षपद भूषवले. पण आजपर्यंतच्या प्रवासात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांच्या वाटय़ाला आले नाही. खरे तर असे का झाले, हा एक महत्त्वाचा प्रश्न अनेक साहित्य रसिकांच्या मनात आहे.
लक्ष्मीकांत तांबोळी यांच्या अनेक कविता गुजरातीत अनुवादित झाल्या. काही कविता तेथील राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात अभ्यासल्या जातात. एवढेच नाही तर अनेक कथा-कवितांचे इंग्रजी, हिंदी, उर्दू, गुजरातीतही अनुवाद झाले आहेत. काही कविता स्वातंत्र्योत्तर मराठी कविता, मराठीचे बोलु कौतुके, देखिला अक्षरांचा मेळा आणि विसाव्या शतकातील प्रातिनिधिक मराठी कविता यात समाविष्ट झाल्या आहेत. तांबोळी यांची महत्त्वाची कादंबरी म्हणजे ‘दूर गेलेले घर’ ही छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, उस्मानिया विद्यापीठ, हैदराबाद, गुलबर्गा विद्यापीठात अभ्यासक्रमात अभ्यासली गेली. ‘कृष्णकमळ’ या कादंबरीवर ‘बंदिवान मी या संसारी’ या नावाचा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. ‘गोकुळवाटा’ या मालिका गीतांचे सादरीकरण, अभिवाचन आजही अनेक ठिकाणी होत असते. प्रा. तांबोळी यांच्या समग्र साहित्यावर ‘अंतर्वेध’ हा मौलिक ग्रंथ प्रकाशित झाला आहे. ज्याचे संपादन डॉ. दीपक कासराळीकर यांनी केले आहे. त्याचप्रमाणे मराठवाडय़ातील साठोत्तरी कविता, गोकुळवाटा ः एक चिकित्सक अभ्यास हा एम.फील.साठी श्यामराव कांबळे नागपूर विद्यापीठात सादर केला. तांबोळी यांच्या साहित्यातील जीवनाभूतीचे दर्शन ः एक आकलन हा ग्रंथ (लेखक, डॉ. इ. जा. तांबोळी) कोल्हापूर विद्यापीठात अभ्यासक्रमास आहे. प्रा. तांबोळी यांनी प्रतिष्ठान या वाङ्मयीन मासिकाचे काही काळ संपादन केले. तसेच चित्रांगण, कुमार भारती, दासगणू स्मरण महोत्सव स्मरणिका, शिवमुद्रा, रामनारायण काबरा अमृत महोत्सवी वर्ष स्मरणिकेचे संपादन केले. या सर्व लेखन योगदानाचा राज्य पुरस्कारासह, विनायक राव चारठाणकर पुरस्कार, (सेलू) नांदेड जि.प.चा नरहर कुरुंदकर पुरस्कार, महाकवी विष्णुदास पुरस्कार, कुसुमताई चव्हाण पुरस्कार, सूर्योदय साहित्य पुरस्कार, जळगाव अशा विविध पुरस्कारांनी गौरव झाला. यात गुजरात साहित्य अकादमीच्या कवी नर्मद पुरस्काराने चार चांद लावले. आज 86 वय असलेले लक्ष्मीकांत तांबोळी तेवढय़ाच उत्साहाने लेखन-वाचनात व्यस्त असतात. नव्या पिढीतील लेखकांनी हा आदर्श समजावा.