
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी नागपूर हिंसाचार आणि औरंगजेब कबर वादावरून थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवर निशाणा साधला. राज्यसभेत चर्चेत दरम्यान संजय राऊत यांनी नागपूरमधील हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित करून केंद्र सरकारवर हल्ला चढवला. यावेळी सभागृहात केंद्रीय मंत्री अमित शहा उपस्थित होते. नई लाशे बिछाने के लिए गढे मुर्दे आपने उखाड दिये… असे संजय राऊत यांनी म्हणताच सत्ताधाऱ्यांचा जळफळाट झाला आणि त्यांनी राज्यसभेत गदारोळ सुरू केला.
सभागृहातील अनेक सदस्यांनी औरंगजेबवर चर्चा केली. काय दिवस आलेत की, या उच्च सभागृहात औरंगजेबवर चर्चा सुरू आहे. याला जबाबदार केंद्रीय गृहमंत्रालय आहे. अशा काही शक्ती आहेत ज्या सतत औरंगजेबचे नाव घेऊन देशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात काही लोक असे आहेत जे महाराष्ट्रात मंत्री आहेत, जे केंद्रात उच्चपदांवर आहेत. त्यांना आपण रोखलं नाही तर देश अखंड राहणार नाही, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
देशात एकता आणि अखंडता कायम राखण्याचे काम हे गृहमंत्रालयाचे आहे. पण गेल्या काही वर्षांपासून या देशाला पोलीस स्टेट बनवले आहे. विरोधकांना दुबळं करणं, राजकीय पक्षांना फोडणं हे प्रत्येक ठिकाणी गृहमंत्रालयाचं काम आहे. आमदार, खासदार यांना विकत घेण्यासाठी पोलिसांना मदत देणं. पण गृहमंत्रालयाचं खरं काम देश एकजूट ठेवणं आणि सुरक्षित ठेवण्याचं आहे. कालपर्यंत मणिपूर हिंसाचारात जळत होतं आता महाराष्ट्रातही होरपळत आहे, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.
नई लाशे बिछाने के लिए गडे मुर्दे आपने उखाड दिये,
नई लाशे बिछाने के लिए गडे मुर्दे आपने उखाड दिये, और वो औरंगजेब के नाम पर…, असे म्हणत संजय राऊत यांनी खरमरीत टीका केली.
नागपूरमध्ये तीनशे वर्षांत कधी दंगा झाला नव्हता. हा नागपूरचा इतिहास आहे. नागपूर सारख्या शहरात दंगा होतो, तोही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या विधानसभा मतदारसंघात होतो. तुम्हाला औरंगजेबची कबर तोडायची आहे तर बेधडक तोडा, तुम्हाला कोणी आडवलं आहे. केंद्रात आणि महाराष्ट्रात तुमचंच सरकार आहे. गृहमंत्री तुमचे आहेत, महाराष्ट्रात मुख्यमंत्री तुमचेच आहेत. हातात फावडे घेऊन जा आणि तोडा. पण तुमच्या मुलांना पाठवा, आमच्या मुलांना पाठवू नका. तुमची मुलं विदेशात शिकत आहेत. विदेशात काम करत आहेत. आणि जी गरीब मुलं आहेत त्यांची माथी भडकवण्याचं काम तुम्ही केलंय, असा वज्राघात संजय राऊत यांनी केला.