
गोरखपूरमध्ये खोराबार येथील गोदामावर छापा टाकण्यात आला. या गोदामामध्ये थंड पेयांचे बाॅक्स ठेवण्यात आले होते. मुख्य म्हणजे या बाटल्यांवरील एक्सपायरी डेट खोडून टाकण्यातही आली होती. कालबाह्य झालेल्या शीतपेयांचे सर्व बाॅक्स यावेळी जप्त करण्यात आले असून, या जप्त केलेल्या मालाची किंमत ही अंदाजे 12 लाख रुपये इतकी आहे.
यासंदर्भात अधिक माहिती देताना सहाय्यक अन्न आयुक्त डॉ. सुधीर कुमार सिंह म्हणाले की, खोराबारमधील जेपी ट्रेडर्सकडे कॅम्पा कोलाचे सी अँड एफ आहे. येथे कालबाह्य झालेले थंड पेये विकल्याची तक्रार मिळाली होती. पथक गोदामात पोहोचल्यावर तिथे मोठ्या प्रमाणात कालबाह्य झालेले थंड पेये आढळून आली. यातील काही थंड पेये वेगळी ठेवण्यात आली होती आणि काही नवीन बाटल्याही ठेवण्यात आल्या होत्या.
गोदामामध्ये 200 मिली पॅकिंगचे 950 बॉक्स, 500 मिलीचे 670 बॉक्स, 200 मिली ऑरेंज कोल्ड्रिंकचे 1280 बॉक्स, 500 मिली ऑरेंज कोल्ड्रिंकचे 255 बॉक्स कालबाह्य आढळले. स्टॉकची माहिती मागवण्यासाठी ऑपरेटरला नोटीस बजावण्यात आली आहे. परवान्यातही त्रुटी आढळून आल्या आहेत. या प्रकरणी नोटीसही बजावण्यात आली आहे.
अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासनाने केलेल्या गोपनीय तपासणीत असे उघड झाले आहे की, काही व्यावसायिक सुमारे दीड लाख रुपयांचे लेसर मशीन खरेदी करून कालबाह्यता तारीख बदलत आहेत. ते नागरिकांना कालबाह्य झालेले थंड पेये देऊन नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत. या तपासणीमध्ये असे दिसून आले आहे की, बहुतेक शीतपेय उत्पादक कंपन्या कालबाह्य झालेल्या शीतपेयांच्या बदल्यात फक्त 50 टक्के पैसे परत करतात. ही रक्कम रोख स्वरूपात नाही तर पाण्याच्या बाटल्यांच्या स्वरूपात दिली जाते. यामुळे व्यावसायिकांचे नुकसान होते. या नुकसानाची भरपाई करण्यासाठी ते कालबाह्य झालेल्या तारखा बदलतात.