London सबस्टेशनमध्ये मोठी आग, हिथ्रो विमानतळ बंद, वीजपुरवठा खंडित झाल्याने हजारो लोक अंधारात

londons-heathrow-airport-closed-after-fire-at-electric-substation

लंडन (London) शहराच्या पश्चिमेकडील भागात एका सबस्टेशनमध्ये आग लागल्याने ‘वीजपुरवठा खंडित’ झाला आहे. 16,000 हून अधिक घरांमध्ये गेल्या काही तासांपासून वीज पुरवठा ठप्प असल्याने लोक अंधारात आहेत. जगातील सर्वात मोठे आणि अत्यंत व्यस्त असलेले लंडनचे हीथ्रो विमानतळ आज मध्यरात्रीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ब्रिटिश माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार 150 हून अधिक लोकांना बाहेर काढण्यात आले आहे.

लंडन अग्निशमन दलाने यासंदर्भात अधिकृत माहिती जारी केली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 10 अग्निशमन गाड्या आणि सुमारे 70 अग्निशमन दलाच्या जवानांना तैनात करण्यात आले आहे आणि 200 मीटर परिसराला सुरक्षेच्या कारणास्तव घेराबंदी करण्यात आली आहे. तसेच लंडनच्या हिलिंग्डन बरोमधील हेस येथे असलेल्या स्थानिक रहिवाशांना धुरामुळे आत राहण्यास आणि दरवाजे-खिडक्या बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

एका एक्स पोस्टमध्ये विमानतळ प्रशासनाने प्रवाशांना प्रवास न करण्याचा आणि अधिक माहितीसाठी त्यांच्या संबंधित एअरलाइन्सशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला असल्याचे म्हटले आहे. ‘विमानतळाला वीजपुरवठा करणाऱ्या एका सबस्टेशनला लागलेल्या आगीमुळे, हीथ्रोमध्ये मोठ्या प्रमाणात वीजपुरवठा खंडित झाला आहे. आमच्या प्रवाशांची आणि सहकाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हीथ्रो 21 मार्च रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत बंद राहील’, असे विमानतळ प्रशासनाने म्हटले आहे.