
महाराष्ट्राच्या सुकांत कदम, प्रेम अले यांनी अपेक्षेप्रमाणे विजयी सलामी देत खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये उपांत्यपूर्व फेरीत धडक देत उद्घाटनाचा दिवस गाजवला. खेलो इंडिया पॅरा स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाचे गुरुवार, 20 मार्च रोजी केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मंडविया यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी क्रीडा संकुलातील जिम्नॅस्टिक्स हॉलमध्ये ही स्पर्धा सुरू झाली. पॅरा बॅडमिंटनमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सकाळपासूनच दमदार कामगिरीचे प्रदर्शन घडविले. एसएल-4 गटांत सांगलीच्या सुकांत कदमने महाराष्ट्राच्याच नीलेश गायकवाडचा 21-10, 21-19 असा सरळ गेममध्ये पराभव केला.
जागतिक क्रमवारीत दुसऱया स्थानावर असणाऱ्या सुकांतने पहिला गेम सहजपणे जिंकून लढतीवर पकड घेतली होती. दुसऱया गेममध्ये त्याला संघर्ष करावा लागला. अनुभवी सुकांतने आघाडी कायम राखत विजयी सलामी दिली. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी करणारा सुकांत प्रथमच खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत सहभागी झाला आहे. पुण्यात प्रशिक्षक निखिल कानेटकर, मयंक गोळे यांच्या मार्गदर्शनाद्वारे सराव करणाऱया सुकांत स्पर्धेतील सुवर्णपदकाचा प्रमुख दावेदार आहे. शुक्रवारी उपांत्यपूर्व फेरीत सुकांतची लढत छत्तीसगडच्या अभिजित सकुजा याच्याविरुद्ध रंगणार आहे.
व्हिलचेअरच्या डब्ल्यूएच-1 गटात महाराष्ट्राच्या प्रेमकुमार अले याने उत्तर प्रदेशच्या सिराजउद्दीनवर 21-12, 21-14 अशी सहज मात करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश निश्चित केला. प्रेमकुमारने सेनादलातून निवृत्त झाल्यानंतर पॅरा बॅडमिंटन खेळण्याचा श्रीगणेशा पुण्यातून केला.
आजपासून ऍथलेटिक्सचा थरार
खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत उद्या, 21 मार्चपासून ऍथलेटिक्सचा थरार रंगणार आहे. ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता सचिन खिलारी दुखापतग्रस्त असल्याने यंदाच्या स्पर्धेत खेळताना दिसणार नाही. गतस्पर्धेत खिलारीने सुवर्णपदक जिंकले होते. यंदा संदीप सलगर, भाग्यश्री जाधव, दिलीप गावीत या पॅरिस ऑलिम्पिकपटू ऍथलेटिक्सचे मैदान गाजवताना दिसतील.