जोरदार युक्तिवाद, उलटतपासणी अन् बुद्धिकौशल्याचे कसब! डॉ. आंबेडकर विधी महाविद्यालयात पार पडली द्वितीय नॅशनल मूट कोर्ट स्पर्धा

अपीलकर्ता आणि प्रतिवादी यांचा युक्तिवाद, दोन्ही बाजूकडून कायदेशीर कौशल्याचे दमदार सादरीकरण… न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्याकडून झालेली उलटतपासणी…अशा वातावरणात वडाळ्याच्या डॉ. आंबेडकर विधी महाविद्यालयात द्वितीय नॅशनल मूट कोर्ट स्पर्धा पार पडली. व्हीपीएम्स टीएमसी ठाणे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

डॉ. आंबेडकर विधी महाविद्यालयाने आयोजित केलेल्या या स्पर्धेत सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांनी अपीलकर्ता व प्रतिवादी अशा दोन्ही भूमिकेत युक्तिवाद करत आपल्या बुद्धिकौशल्याचे कसब दाखवले. खारघरच्या गोखले एज्युकेशन सोसायटीचे विधी महाविद्यालय स्पर्धेचे उपविजेते ठरले. मुख्य अतिथी न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांनी स्पर्धकांचे कौतुक केले. यावेळी अॅड. प्रशांत मलिक आणि अॅड. प्रेमलाल क्रिशनन यांनी स्पर्धा यशस्वी करण्यात मोलाची कामगिरी बजावली. अॅड. रवी जाधव, पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे सचिव संजीव बौधनकर, प्रभारी प्राचार्य गवई, उपप्राचार्य सोनकर, श्रीकांत ओझा, लक्ष्मण बेडेकर यावेळी उपस्थित होते. मिरल शहा, डॉ. शोबित खंदारे, नितेश झा, अफसर अन्सारी, मनीषा जगताप यांनी स्पर्धा यशस्वी करण्यात मोलाचा वाटा उचलला.

यशस्वी स्पर्धक – सिद्धार्थ महाविद्यालयाचा धानेश शर्मा (सर्वोत्तम मूटर), चेंबूर कर्नाटका विधी महाविद्यालयाची अशिका बोस (उप सर्वोत्तम मूटर), भिवंडीचा सर्फराज शेहजाद अन्सारी (सर्वोत्तम संशोधक), माहीमच्या एमईएस न्यू लॉ कॉलेजचा प्रवीण थोरात (बेस्ट मेमोरियल), मुंबई विद्यापिठाच्या विधी अकादमीचा आर्या न्यायाधीश (बेस्ट ड्रेसकोड), जीवनदीप विधी महाविद्यालयाची विधी रिझवानी (बेस्ट ड्रेसकोड) यांना पारितोषिक देऊन गौरविले. क्ले लॉ कॉलेज, कळंबोली सर्वोत्तम अपीलकर्ता तर अॅग्नेल स्कूल ऑफ लॉ हे सर्वोत्तम प्रतिवादीचे मानकरी ठरले.