ज्वेलर्सचे दुकान फोडणारे अटकेत

वांद्रे येथे एका ज्वेलर्सच्या दुकानात घरफोडी करणाऱ्या दोघांना वांद्रे पोलिसांनी अटक केली. आर्या नाग ऊर्फ दीपक ध्रुव आणि रवींद्र कुमार गुप्ता अशी त्या दोघांची नावे असून ते छत्तीसगड आणि उत्तर प्रदेशचे रहिवासी आहे. त्या दोघांकडून पोलिसांनी 1 कोटी 91 लाखांचे दागिने जप्त केले आहेत. ते दोघे आंतरराज्य टोळीतील असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

वांद्रे परिसरात एक नामांकित ज्वेलर्सचे शोरूम आहे. 8 मार्चला रात्री तक्रारदार याने शोरूम बंद करून ते घरी गेले. सोमवारी सकाळी ते शोरूम उघडण्यासाठी आले तेव्हा एका कर्मचाऱ्याला तिजोरीमधील सोने आणि हिऱयाच्या वस्तू गायब असल्याचे दिसले. चोरटा हा शोरूमच्या खिडकीतून आला. त्याने प्रवेश केल्यावर सीसीटीव्ही पॅमेरा बंद केला. तिजोरीचे लॉक तोडून दागिने घेऊन ते पळून गेले.

दागिने चोरीप्रकरणी त्याने वांद्रे पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तपासासाठी सातहून अधिक पथक तयार केली. तांत्रिक माहिती आणि फुटेजच्या आधारे पोलिसांनी आर्या आणि रवींद्र कुमारच्या मुसक्या आवळल्या. कसून चौकशी केल्यावर त्याने घरफोडीची कबुली दिली. पोलिसांनी त्या दोघांकडून 1 कोटी 91 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. त्या दोघांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.