
अंधेरी आणि पवई येथे आग लागल्याची घटना गुरुवारी घडली. अंधेरी येथील इंडस्ट्रियल इस्टेटला लागलेल्या आगीत अग्निशमन दलाचे चार जवान जखमी झाले तर पवईतील एका टॉवरला लागलेल्या आगीत 60 जण सुदैवाने बचावले आहेत.
अंधेरी पूर्व शांतीनगर येथील न्यू इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास आग लागली. आग विझविताना देवेंद्र यादव (30), तुषार हराड (25) प्रकाश इंगोले (30) आणि संध्या फराडे (34) हे चार अग्निशमन दलाचे कर्मचारी जखमी झाले. तर पवईच्या साई सफिरे या 24 मजली इमारतीमध्ये 17 व्या मजल्यावर डक्टिंगमध्ये लागलेल्या आगीत अग्निशमन दलाच्या जवानांनी 50-60 जणांची सुखरूप सुटका केली.