
विधिमंडळाच्या आजच्या कामकाजात कार्यक्रम पत्रिकेवर अंतिम आठवडा प्रस्ताव दाखल करण्यात आल्याने अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज शुक्रवारी गुंडाळण्यात येईल, अशी जोरदार चर्चा विधानभवन परिसरात रंगली होती. यासंदर्भात काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करीत राज्य सरकारने खुलासा करण्याची मागणी केली. त्यावर सभागृहाचे कामकाज हे कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे होईल आणि 26 मार्चपर्यंत अधिवेशन चालणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. अखेरच्या आठवडय़ात संविधानावर चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.