युद्धाचे ढग… तैवानजवळ 59 चिनी लढाऊ युद्धनौका तैनात

बलाढय़ चीनला आव्हान देण्यासाठी तैवानने पाच दिवसांचा रॅपिड रिस्पॉन्स सिस्टम्स अर्थात जलद प्रतिक्रिया सराव सुरू केला आहे. चीनकडून वाढत्या लष्करी धोक्याच्या पार्श्वभूमीवर तैवानने हे पाऊल उचलले आहे. चीनने कोणत्याही क्षणी हल्ला केल्यास त्वरित कारवाई करण्याचे प्रशिक्षण सैनिकांना दिले जात आहे. चीनने अलीकडेच तैवानभोवती 59 चिनी लढाऊ युद्धनौका तैनात केल्या आहेत. याशिवाय चीनने यास तैवानच्या स्वातंत्र्य समर्थक धोरणांसाठी ही शिक्षा असल्याचे म्हटले आहे. चीन गेल्या काही दिवसांपासून सातत्याने तैवानवर बळजबरीने ताबा मिळवण्याची धमकी देत असताना तैवानने हा सराव सुरू केला आहे. विशेष म्हणजे जर तैवानने स्वतंत्र राष्ट्र बनण्याच्या दिशेने कोणतेही पाऊल उचलले तर लष्करी कारवाई केली जाईल, या इशाऱ्याचा पुनरुच्चार चीनने केला.

सुरक्षा मजबूत करण्याची आवश्यकता

चीनचे सैनिक आधीपेक्षा जास्त वेगाने हल्ला करू शकतात. त्यामुळे आपल्याला अधिक तयार राहावे लागेल. चीनच्या लष्करी कारवाया दिवसेंदिवस अधिक आक्रमक होत आहेत. आम्हाला आमची सुरक्षा आणखी मजबूत करण्याची आवश्यकता आहे, असे तैवानचे संरक्षण मंत्री चिउ कुओ-चेंग यांनी म्हटले आहे.