
जनतेशी संबंधित महत्त्वाच्या प्रश्नांवर विधिमंडळात विरोधी पक्षाच्या आमदारांकडून लक्षवेधी सूचना मांडल्या जातात. त्याचा जाब सरकारला द्यावा लागतो. संबंधित मंत्र्यांना सभागृहात उत्तर द्यावे लागते. पण गृह विभागातील काही अधिकाऱ्यांनी सभागृहात चर्चेला न आलेल्या लक्षवेधी सूचनेचे गोपनीय उत्तर व्हायरल केल्याचे शिवसेना आमदार कैलास पाटील यांनी आज विधानसभेत उघडकीस आणले.
तुळजापूर व आसपासच्या जिह्यांमध्ये ड्रग्ज विकले जात असल्याबाबतची ही 2366 क्रमांकाची महत्त्वाची लक्षवेधी सूचना होती. ती अद्याप सभागृहात चर्चेला आलेली नाही. लक्षवेधी सूचनेवर उत्तर मिळावे म्हणून अध्यक्षांना विनंती करून त्याचा बरेच दिवस पाठपुरावा करावा लागतो. मात्र चर्चेलाच न आलेल्या या लक्षवेधीचे उत्तर तुळजापूर व आसपासच्या तालुक्यांमध्ये व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाले आहे, असे कैलास पाटील यांनी सभागृहाला सांगितले. तालिका अध्यक्षांनी त्याची तातडीने दखल घेत शासनाने याबाबत तपास करावा, असे निर्देश दिले. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणी तपासणी करून संबंधित अधिकाऱयांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन सभागृहाला दिले.