जाऊ शब्दांच्या गावा – बोले सुने आणि लागे धुवे

>> साधना गोरे

‘‘एकुलत्या धुवाडीचं लगीन हाय. लग्नाला तर जायला लागतंय. मोकळ्या हातानं जाऊन जमतंय व्हय?’’ बसच्या खिडकीशी ऊन-ऊन झळा अंगावर घेत एक काका कुणाशी तरी फोनवर बोलत होते. त्यांच्या हेलावरून ते पश्चिम महाराष्ट्रातले आहेत हे कुणीही ताडलं असतं, पण त्यांच्या संवादातला ‘धुवाडी’ शब्द खास होता. त्यावरून ते पश्चिम महाराष्ट्रातल्या माणदेशातले आहेत, हे मी लगेच हेरलं. माणदेश म्हणजे सांगली, सातारा, सोलापूर या जिह्यांतला माण नदीच्या भोवतालचा प्रदेश. माणदेशी बोलीत काही शब्द वेगळे आहेत, त्यातलाच एक धुवाडी.

मराठी आणि सगळ्याच भारतीय भाषा नातेवाचक शब्दांच्या बाबतीत कशा श्रीमंत आहेत, हे आपण मागील ‘अकाबाईचा फेरा’ या लेखात पाहिलं होतं. मराठीतला असाच एक नातेवाचक शब्द म्हणजे पुतणी. पुरुषाच्या भावाची मुलगी किंवा स्त्राrच्या दिराची मुलगी म्हणजे पुतणी, पण पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः माणदेशाच्या पट्टय़ात पुतणीला ‘धुवाडी’, ‘ध्वाडी’ असा शब्द वापरला जातो. या धुवाडी शब्दाचं पुल्लिंगी रूप मात्र नाही. म्हणजे पुतण्याला ‘पुतण्या’ असाच शब्द आहे. धुवाडीवरून ‘धुवाडा’ असा पुल्लिंगी शब्द तयार झालेला नाही. त्यामुळे हा ‘धुवाडी’ शब्द ऐकला की, मन जरा बुचकाळ्यातच पडायचं.

मग भाषा अभ्यासक गणेश देवी आणि अरुण जाखडे यांनी संपादित केलेलं ‘भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण’ हे पुस्तक हाती आलं. त्यात महाराष्ट्रातल्या बऱयाच बोलींची माहिती आहे. मालवणी आणि ठाकर या आदिवासी जमातीची ठाकरी या दोन बोलींमध्ये पुतणीला ‘धुवडी’ शब्द असल्याचं त्यात वाचलं. ठाकरी बोलीत तर पुतण्यासाठी ‘धुवडा’ असा पुल्लिंगी शब्दही आहे, तरी ‘धुवाडी’ किंवा ‘धुवडी’ हा शब्द मूळ कुठला हा प्रश्न मनात कायमच होता.

शेवटी कृ. पां. कुलकर्णींचा ‘व्युत्पत्तिकोश’च मदतीला आला. जुन्या मराठीत ‘धुई’, ‘धुव’ असे शब्द होते. त्याचा अर्थ होतो मुलगी. ‘व्युत्पत्तिकोशा’तले वेगवेगळ्या भाषांमधले ‘धुव’ची रूपं पाहून आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. संस्कृतमधील ‘दुहितृ’ शब्द द्रुही – धुई – धुव असा बदलत मराठीत आला. प्राकृतमध्ये त्याची धूआ, धीआ, धीदा, धूदा, धीया, धूया अशी रूपं आहेत. पालीमध्ये धीता, धीतु, धीतर शब्द आहेत. ध्वनीमध्ये बदल होऊन बंगालीमध्ये ‘झी’, ओडियामध्ये ‘झिय’ म्हटलं जातं. सिंधीमध्ये धिउ, धिय आणि पंजाबी, हिंदी, गुजरातीमध्ये ‘धी’ अशी रूपं दिसतात. अवेस्ता भाषेतील ‘दुहितर’, फारसीतील ‘दुख्तर’ आणि इंग्रजीतील ‘डॉटर’ हे सगळे एकाच साखळीतील शब्द आहेत व त्यांचा अर्थ मुलगी असाच होतो.

धुव म्हणजे दुहितृ या शब्दाची एवढी रूपं पाहिली. त्याला जोडून आणखी एक संदर्भ पाहणं मोठं रोचक आहे. एवढ्या वेगवेगळ्या भाषांमध्ये मुलीसाठी एकच शब्द वापरला जात होता, त्याच्या मुळाशी संस्कृतमधीलच ‘दुह्’ हा शब्द (धातू) आहे. या दुह् शब्दामध्ये पिळण्याचा, एखाद्या वस्तूपासून दुसरी वस्तू काढून घेण्याचा भाव आहे. त्यावरून ‘दुह्’ या मूळ शब्दाचा अर्थ धार काढणे असाही होतो. जगभरातल्या भाषांवर प्राचीन पशुपालन संस्कृतीचा मोठा प्रभाव आहे. या संस्कृतीत जनावरांची धार काढण्याची जबाबदारी घरातल्या मुलींची असावी. धार काढण्याच्या प्रकियेत गाई-म्हशीची कास पिळून दूध काढलं जातं. त्यावरून धार काढणारी ती ‘दुहिता’, ‘दुहितृ’ असं नामकरण झालं असावं.

‘धुवाडी’ शब्दाचा शोध घेता घेता आपण पार पशुपालन संस्कृतीपर्यंत जाऊन पोहोचलो. मराठीत मुलगी या अर्थाचा ‘धुव’ शब्द हल्ली वापरला जात नाही, पण भावाच्या किंवा दिराच्या मुलीला धुवाडी, धुवडी हे शब्द आजही माणदेशी, मालवणी, ठाकरी बोलीत वापरले जाताहेत.

शेवटी शीर्षक-म्हणीकडे यायलाच हवं. आजच्या घडीला मराठीत सर्वोच्च ‘टीआरपी’ असणारी एक म्हण आहे. ती म्हण म्हणजे, ‘लेकी बोले सुने लागे’. म्हणजे बोलायचं एकाला, पण शब्दांचा बाण ज्याच्या वर्मी बसला पाहिजे तो निराळाच असतो, अशा वेळी ही म्हण वापरली जाते. या म्हणीचा एक पाठभेद म्हणजे आजच्या तंत्रज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर एक नवंच ‘व्हर्जन’ सापडलं आहे. तो पाठभेद असा आहे, ‘बोले सुने आणि लागे धुवे’. या नव्या व्हर्जनमध्ये सुनेची आणि धुवेची भूमिका चक्क बदलली आहे की! म्हणजे पशुपालक समाज असो की तंत्रज्ञानाधिष्ठत, जगात बदल ही एकच गोष्ट शाश्वत आहे जणू!