
नागपूर दंगलीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अखेर मौन सोडले. औरंगजेबाचा मुद्दा सध्याच्या घडीला संयुक्तिक नाही. संघ कुठल्याही प्रकारच्या हिंसाचाराचे समर्थन करत नाही, अशी स्पष्ट भूमिका प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी आज मांडत भाजपचे कान टोचले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रतिनिधी सभा 21 ते 23 मार्चदरम्यान बंगळुरूमध्ये होत आहे. या पार्श्वभूमीवर सुनील आंबेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना देशात अनेक महत्त्वाचे प्रश्न असताना औरंगजेबाचा प्रश्न समोर करून आंदोलन करणे योग्य आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर आंबेकर यांनी औरंगजेबाचा मुद्दा सध्याच्या घडीला संयुक्तिक नसल्याचे सांगितले.
विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या आंदोलनानंतर नागपूरमध्ये झालेल्या दंगलीबाबत संघाची भूमिका काय? असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला. यावर संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख असणाऱ्या आंबेकर यांनी कोणत्याही प्रकारचा हिंसाचार हा समाजाच्या स्वास्थासाठी चांगला नाही. संघ कुठल्याही प्रकारच्या हिंसेचे समर्थन करत नसल्याचे स्पष्ट केले. नागपूरमध्ये घडलेल्या घटनेची पोलिसांनी दखल घेतली असून ते त्याच्या मुळाशी जाऊन तपास करतील, असे ते म्हणाले.