बेरोजगारीविरोधात काँग्रेसचे आंदोलन, पुणे ते मुंबई लाँग मार्च पोहोचला आझाद मैदानात

दावोसला जाऊन कोट्यवधींची गुंतवणूक आणली असून लाखो रोजगारनिर्मिती झाल्याचा सरकारचा दावा सपशेल खोटा आहे. त्यामुळे राज्य सरकारचा खोटा दावा आणि बेरोजगारीविरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने पुणे ते मुंबई अशी पदयात्रा काढून सरकारचा निषेध करण्यात आला.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित या आंदोलनात महाराष्ट्रातील युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न, महिलांच्या सुरक्षेशी संबंधित प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, पेपरफुटीसंबंधित प्रश्न, महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षा आणि त्यांच्या रोजगाराचे प्रश्न अशा विविध प्रश्न व समस्यांबाबत राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेला मोर्चा आज आझाद मैदानात धडकला. यावेळी अखिल युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदयभानू चिब, काँग्रेस नेते नाना पटोले, अजय चिकारा, बंटी शेळके, अजित सिंग, एमपीवायसीचे उपाध्यक्ष प्रशांत ओगले, श्रीनिवास नल्लमवार आणि कायदेशीर विभागप्रमुख अॅड. निखिल कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.