कपात सूचनांना महिन्यात लेखी उत्तर मिळावे, सुनील प्रभू यांचे विधानसभा अध्यक्षांना पत्र

आमदारांनी सादर केलेल्या कपात सूचनांना मंत्र्यांकडून एक महिन्यात लेखी उत्तर मिळावे असे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी द्यावेत, अशी मागणी शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी आज पत्राद्वारे केली.

विधानसभा व विधान परिषदेचे आमदार जनतेच्या कल्याणासाठी कपात सूचना मांडत असतात. त्या सूचनांना संबंधित विभागाच्या मंत्र्यांनी एक महिन्याच्या आत लेखी उत्तर देणे अपेक्षित होते, मात्र गेल्या काही वर्षांपासून मंत्र्यांकडून कपात सूचनांना उत्तरेच मिळत नाहीत. काही आमदारांना तर एका वर्षानंतर उत्तरे पाठवण्यात येतात तर काहींना उत्तरेच पाठवली जात नाहीत. वेळेवर उत्तर मिळाल्यास आमदारांना त्या विषयाचा पाठपुरावा करता येतो, असे सुनील प्रभू यांनी या पत्रात नमूद केले आहे. लेखी उत्तर वेळेत दिल्यास सर्वांना न्याय मिळेल अशी भूमिकाही त्यांनी मांडली.