एसआरएच्या लाभार्थ्यांचे होणार बायोमेट्रिक सर्वेक्षण, दोषी कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई

झोपडपट्टी पुनर्वसन योजना अधिक पारदर्शक होण्यासाठी आणि पात्र लाभार्थींना न्याय देण्याच्या दृष्टीने घरोघरी जाऊन बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्यात येत आहे. तसेच ‘झोपु’ योजनेतील सदनिका वाटपामध्ये दोषी अधिकाऱ्यांवर व संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली.

विधान परिषद सदस्य अ‍ॅड. निरंजन डावखरे यांनी अर्धा तास चर्चेदरम्यान उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री भोयर बोलत होते. ते म्हणाले, प्रकल्पाच्या ठिकाणी जीआयएस मॅपिंग सुरू आहे. झोपडपट्टीचा 360 डिग्री इमेज व जिओ टॅगिंग सुरू केलेली आहे. रिमोट सेन्सिंग डाटा तयार करत असून ऑनलाईन सदनिका वाटप प्रणालीदेखील सुरू करण्याचे नियोजन आहे. अंधेरी येथील ‘झोपु’ योजनेतील 21 सदनिकाधारक असे आढळले की, जे पात्र नसतानाही त्या ठिकाणी त्यांना ताबा दिला आहे. यातील बारा अपात्र आहे आणि नऊ जणांकडे कोणतीही कागदपत्रे नाहीत. 30 दिवसांच्या आत या अपात्र सदनिकाधारकांना निष्कासित करण्यात येणार आहे.