
दक्षिण मुंबई व उपनगरातील गंजेडींना गांजा विकणाऱ्या एका सराईत आरोपीच्या पोलीस निरीक्षक दया नायक व त्यांच्या पथकाने मुसक्या आवळल्या. वांद्रे येथे एक खोली घेऊन तेथे त्याने गांजाचा साठा करून ठेवला होता. त्या ठिकाणी धडक देऊन पथकाने तब्बल 286 किलो 68 ग्रॅम वजनाचा गांजाचा साठा हस्तगत केला. 71 लाख 67 हजार इतकी या गांजाच्या साठय़ाची किंमत असल्याचे सांगण्यात येते.
वांद्रे पश्चिमेकडील के. सी. मार्गावर असलेल्या ट्रान्झिट कॅम्पमध्ये एका खोलीत गांजाचा साठा करून ठेवण्यात आला असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट-9 चे सहाय्यक फौजदार सुभाष शिंदे यांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक दया नायक यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि महेंद्र पाटील, घोडके, उपनिरीक्षक काकडे तसेच शार्दुल बनसोडे, दत्ता कोळी, खडापकर, वैभव, राहुल पवार या पथकाने गांजाची खरेदी विक्री करणारा इम्रान अन्सारी (36) याला उचलले. त्यानंतर त्या ठिकाणी जाऊन खोलीची झडती घेतली. तेव्हा तेथे कोणालाही कळणार नाही अशा पद्धतीने गोण्यांमध्ये भरून ठेवलेला गांजाचा साठा सापडला. ताडदेव येथे राहणारा इम्रान टॅक्सीचालक आहे, परंतु तो सराईत गुन्हेगार आहे. त्याच्या विरोधात विविध स्वरूपाच्या गंभीर गुह्यांची नोंद आहे. चौकशीत त्याने हा गांजाचा साठा करून ठेवल्याचे व तो हा गांजा दक्षिण मुंबई व उपनगरातील गंजेडींना विकतो असे कबूल केले.
ताडदेव येथे राहत असला तरी इम्रानने वांद्रय़ाच्या त्या ट्रान्झिट पॅम्पमध्ये ती खोली भाडय़ाने घेतली होती. तेथे तो खरेदी केलेला गांजाचा साठा करून ठेवायचा. मग मागणी होईल त्याप्रमाणे तो नशेबाजांना गांजा विकायचा. आता तो गांजा कुठून आणायचा याचा पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान, त्या खोलीच्या मूळ मालकाने शाहीद (नाव बदललेले) या व्यक्तीला खोली भाडय़ाने दिली होती. मग शाहीदने ती खोली इम्रानला भाडय़ाने दिली. तेथे इम्रानने गांजाचा साठा करण्यास सुरुवात केली होती.