नाव अमित शहा आहे म्हणून तुम्ही हुकूमशाही करू शकणार नाही, साकेत गोखले यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना राज्यसभेत सुनावले

राज्यसभेत गृह मंत्रालयावरील चर्चेदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि तृणमूल कॉँग्रेसच्या खासदार साकेत गोखले यांच्या जोरदार खडाजंगी झाली. फक्त तुमचे नाव अमित शहा आहे याचा अर्थ तुम्ही हुकूमशाही कराल असा होत नाही, अशा शब्दांत साकेत गोखले यांनी गृहमंत्र्यांना सुनावले.

गृह मंत्रालयावरील चर्चेदरम्यान साकेत गोखले यांनी ईडी आणि सीबीआयचा मुद्दा उपस्थित केला. यावर अमित शहा म्हणाले, गृह मंत्रालयासंबंधी चर्चा होत आहे, पण साकेत गोखले ईडी आणि सीबीआयची चर्चा करत आहेत. पण तरीही त्यांना हा मुद्दा उपस्थित करायचा असेल तर मलाही संधी द्यावी आणि मी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देईन. त्यानंतर गोखले यांनी एक टिप्पणी केली. त्यावर अमित शहा चांगलेच संतापले.

गोखले यांनी केलेल्या वक्तव्यावरून भाजप खासदारांनी गोंधळ घालत ते कामकाजातून काढून टाकण्याची मागणी केली. तृणमूल कॉँग्रेसच्या खासदारांनी आक्रमक होत भाजपच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. दरम्यान, सभापती जगदीप धनखड यांनी वादग्रस्त शब्द मागे घेण्याचे निर्देश दिले. तृणमूल खासदार साकेत गोखले यांनी मी माझे शब्द परत घेणार नसल्याचे ठणकावून सांगितले.