
षटकांची गती संथ राखल्यामुळे गेल्या मोसमात हार्दिक पंड्यावर एका सामन्यासाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे आयपीएलच्या नव्या मोसमात हार्दिक पंड्याऐवजी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सचा संघ खेळणार आहे, अशी माहिती खुद्द हार्दिक पंड्याने दिली.
गेल्या मोसमात रोहित शर्माकडून नेतृत्वाची जबाबदारी काढून घेत हार्दिक पंड्याला मुंबईचे कर्णधारपद सोपविण्यात आले होते. त्यानंतर मुंबई इंडियन्सची कामगिरी अत्यंत खालावली होती. तेव्हा हार्दिकवर प्रचंड शेरेबाजीही करण्यात आली होती. एकप्रकारे मुंबई इंडियन्सचे नेतृत्व पंड्याला फारसे फळले नव्हते. 14 पैकी केवळ चारच सामन्यांत मुंबईला विजय मिळवता आला.
परिणामतः मुंबईवर तळाचे स्थान राखण्याची नामुष्की ओढावली होती. याच मोसमात पराभूत मुंबईला आपल्या षटकांची गतीही राखता आली नव्हती. त्यामुळे कर्णधार म्हणून पंड्याला एका सामन्यासाठी बंदीची शिक्षा ठोठावण्यात आली. ती बंदी चेन्नई सुपरकिंग्जविरुद्धच्या सलामीच्या लढतीतच भोगावी लागणार आहे. या सामन्यासाठी रोहित शर्माकडे मुंबईचे नेतृत्व सोपविले जाईल, असा अंदाज होता. मात्र आज हार्दिकने रोहित नव्हे तर हिंदुस्थानचा टी-20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव नेतृत्व करणार असल्याचे सांगितले. त्याच्याकडे नेतृत्वाचा अनुभव असल्यामुळे जे गेल्या मोसमात मुंबईला करता आले नव्हते तो विजयी श्रीगणेशा यंदा सूर्या मुंबईला मिळवून देईल, असा विश्वासही त्याने याप्रसंगी बोलून दाखवला.
संघात स्थान मिळवायचे असेल तर परफेक्ट अष्टपैलू असायला हवे
इम्पॅक्ट प्लेअरमुळे आयपीएलच्या आव्हानात खूप मोठा बदल झाला आहे. हा नियम अजून तीन वर्षे कायम असेल. त्यामुळे अशा स्थितीत अंतिम 11 खेळाडूंमध्ये स्थान मिळवायचे असेल तर परफेक्ट अष्टपैलू असणे गरजेचे आहे. या नियमामुळे प्रत्येक संघ आपला एक खेळाडू बदलताना त्याच्याऐवजी स्पेशालिस्ट फलंदाज किंवा स्पेशालिस्ट गोलंदाजाची निवड करतो. अशावेळी प्रत्येक संघ आपल्या अष्टपैलू खेळाडूंकडे कानाडोळा करत आहेत. त्यामुळे स्पेशालिस्ट अष्टपैलूच अंतिम संघात आपला दावा पक्का करू शकतो. फिफ्टी-फिफ्टी असलेला अष्टपैलू याघडीला संघात बसूच शकत नाही.
पुढे हा नियम बदलेल की नाही याबद्दल आताच अंदाज बांधणे कठीण आहे. मात्र संघात अधिक अष्टपैलू खेळाडूंना खेळविण्याची इच्छा असेल, त्यांना प्रोत्साहन देण्याची इच्छा असेल तर संघात एक निश्चित स्थान त्यांच्यासाठी असायलाच हवे, असे पंड्या म्हणाला. गेल्या वेळी आम्ही निराशाजनक खेळ करून सर्वांना निराश केले होते, पण आता आम्ही दोन जेतेपदे जिंकून मैदानात उतरतोय. त्यामुळे आता तोच फॉर्म आयपीएलमध्येही कायम राहील. गेले चार मोसम मुंबईसाठी चांगले नव्हते, मात्र या मोसमात आम्ही एक होऊन खेळणार असल्याचेही तो म्हणाला.