
हिंजवडी आयटी पार्कमधील कंपनीत कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो ट्रव्हल्स बसला लागलेल्या आगीत चार कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. एका महिलेसह चौघांनी प्रसंगावधान राखत बसमधून उडी मारल्याने ते बचावले. बुधवारी (दि. 19) सकाळी पावणेआठच्या सुमारास हिंजवडी आयटी पार्कमध्ये विप्रो सर्कलजवळ ही घटना घडली.
शंकर कोंडिबा शिंदे (63, रा. नऱहे, आंबेगाव), गुरुदास खंडू लोखरे (40, रा. हनुमान नगर, पौड फाटा), सुभाष सुरेश भोसले (45, रा. त्रिलोक सोसायटी, वारजे माळवाडी), राजेंद्र सिद्धार्थ चव्हाण (42, रा. सिंहगड रोड, वडगाव बुद्रूक) अशी मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. तर बसचालक जनार्दन हंबर्डीकर, विश्वास खानविलकर, चंद्रकांत मलजी, प्रवीण निकम, संदीप शिंदे, विश्वास जोरी हे चार जण कामगार जखमी असून त्यांच्यावर हिंजवडीतील रुबी हॉल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी दोघे 40 टक्क्यांहून अधिक भाजले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. एक कर्मचारी 20 टक्के, तर एक जण 5 टक्के भाजला असून एक किरकोळ भाजला आहे. विश्वास गोडसे, मंजिरी आडकर, विठ्ठल दिघे, प्रदीप राऊत यांनी प्रसंगावधान राखत बसच्या दरवाजातून उडी मारल्याने ते बचावले.