
सुनीता विल्यम्स पृथ्वीवर सुखरूप परतल्यानंतर त्यांच्या मूळ गावी म्हणजेच गुजरातमधील मेहसाणा जिह्यातील झुलासन गावात मोठा जल्लोष करण्यात आला. फटाके फोडण्यात आले, मिठाई वाटण्यात आली. गावची लेक सुरक्षित परतल्याबद्दल गावकऱ्यांनी यज्ञ, आरती केली. हर हर महादेवचा जयघोष केला. सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांनी सुनीताच्या पह्टोसह मिरवणूक काढली.
इस्रोकडून अंतराळवीरांचे कौतुक
‘‘आयएसएसवरील दीर्घ मोहिमेनंतर तुमचे सुरक्षित पुनरागमन ही एक उल्लेखनीय कामगिरी आहे. हा प्रवास नासा, स्पेसएक्स आणि अमेरिकेच्या अंतराळ संशोधनातील वचनबद्धतेचा पुरावा आहे,’’ असे म्हणत इस्रोने सुनीता विल्यम्स यांच्या अंतराळ संशोधनातील कौशल्याचा वापर करण्याची इच्छा व्यक्त केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत म्हटलंय, ‘‘तुमचं स्वागत आहे क्रू 9! पृथ्वीने तुम्हाला मिस केलं होतं. ही साहस, हिंमत आणि असीम मानवीय भावनांची परीक्षा होती. सुनीता विल्यम्स आणि क्रू 9च्या अंतराळवीरांनी पुन्हा एकदा दृढतेचा वास्तविक अर्थ काय असतो हे आपल्याला दाखवून दिलं आहे.’’
पृथ्वीच्या वातावरणाशी जुळवून घेणार
दीर्घ काळ अंतराळात राहिल्याने शरीरात झालेले बदल, शरीराची झालेली झीज किंवा त्यांच्या शरीराने अंतराळ स्थानकातील वातावरणाशी जुळवून घेतल्याने बदललेल्या गोष्टी पूर्वपदावर येण्यासाठी काही काळ द्यावा लागेल. त्यांना ‘अक्लमेटायझेशन प्रोग्राम’ अंतर्गत एकूण 45 दिवस तज्ञांच्या देखरेखीखाली योग्य उपचार घ्यावे लागणार आहेत.
नऊ महिने अंतराळात काय केले…
सुनीता विल्यम्स यांनी स्पेस स्टेशनबाहेर तब्बल 62 तास 9 मिनिटे घालवली, अर्थात 9 वेळा स्पेसवॉक केले. त्यांच्या टीमने 900 तास संशोधन केले. त्यांनी 150हून अधिक प्रयोगही केले.
तोच क्षण… पण ड्रगन यानाने सुरक्षित पृथ्वीवर आणले
‘ड्रगन’ यानाने पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करताच प्रचंड घर्षणाने यानाचे तापमान 1600 अंशावर पोहोचले. यानाचा नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटला. ही सात मिनिटे अत्यंत जीवघेणी होती. काही वर्षांपूर्वी हाच क्षण कल्पना चावलाच्या यानाने अनुभवला होता. परंतु दुर्दैवाने त्या वेळी कल्पना चावलाला परत घेऊन येणारे यान एवढे तापमान सहन करू शकले नाही आणि त्याच्या अंतराळातच ठिकऱ्या उडाल्या. मात्र ‘ड्रगन’ यानाने कसोटीचा हा क्षण पार पाडला आणि नासाच्या नियंत्रण कक्षातील संशोधकांच्या आनंदाला पारावार उरला नाही. ‘पृथ्वीवर आपल्या चौघांचे स्वागत आहे’ असा संदेश नियंत्रण कक्षातून येताच कमांडर निक हेग यांनी त्याला ‘आम्हीही पृथ्वीवर उतरण्यास उत्सुक आहोत’ असे उत्तर दिले.
जे वचन दिले ते पूर्ण केले -डोनाल्ड ट्रम्प
“सुरक्षित परतीचे श्रेय एलॉन मस्क यांना द्यायला हवं. वचन दिलं होतं जे पूर्ण केले आहे. अमेरिकेच्या अध्यक्षांनी नऊ महिने अंतराळात अडकलेल्या अंतराळवीरांना वाचवण्याचं वचन दिलं होतं. आज ते अमेरिकेच्या आखातात सुरक्षितपणे उतरले आहेत. एलॉन मस्क, स्पेसएक्स आणि नासाचे आभार!’’ असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले.
डॉल्फिन्सची सलामी
सुनीता यांच्या कॅप्सूलभोवती नासाच्या कॅमेऱ्यांनी एक विलक्षण गोष्ट टिपली. कॅप्सूलच्या अवतीभवती डॉल्फिन्स अवतरले. कॅप्सूलभोवती रिंगा रिंगा… करत डॉल्फिन्सनी जणू त्यांना सलामी दिली.
17 तासांचा थरारक प्रवास
ताशी 28 हजार कि.मी. वेगाने ‘ड्रॅगन’ यान पृथ्वीकडे झेपावले. यानाने पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करताच घर्षणाने यानाचे तापमान 1600 अंशावर पोहोचले. यानाचा संपर्क तुटला. त्यानंतर सात मिनिटांनी पुन्हा संपर्क झाला.
असा झाला परतीचा प्रवास
n 18 मार्च 2025, सकाळी 8.15 वाजता – सर्व अंतराळवीर क्रू-9 या अवकाश यानात बसले आणि त्यांनी हे यान आयएसएसपासून वेगळे केले. तत्पूर्वी यानाची यांत्रिक व सुरक्षा तपासणी झाली. त्यानंतर यानाने पृथ्वीच्या दिशेने उड्डाण सुरू केले.
n आयएसएसच्या कक्षेतून बाहेर पडण्यासाठी सुरुवातीला यानाचा वेग ताशी 27,000 किलोमीटरपेक्षा जास्त होता. त्यानंतर पृथ्वीच्या कक्षेत येण्यासाठी यानाने योग्य दिशा व मार्ग निश्चित केला. हा टप्पा पूर्ण करण्यासाठी 17 तास लागले.
n 19 मार्च, पहाटे 3 वाजता – क्रू-9 ने पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश केला. त्यानंतर काही मिनिटांनी यान पृथ्वीच्या वातावरणात स्थिरावले. याला रिएंट्री म्हणतात. हा सर्वात आव्हानात्मक टप्पा होता. वातावरणातील घर्षणामुळे सुमारे 1500 ते 1650 अंश सेल्सिअस इतके तापमान निर्माण झाले. मात्र यानावरील हिट शिल्डमुळे यान व यानातील अंतराळवीर सुरक्षित राहिले.
n 19 मार्च, पहाटे 3.20 वाजता – पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 10 किलोमीटर उंचीवर यानाचा वेग अजून कमी झाला. यासाठी पॅराशूट उघडण्यात आले.
n 19 मार्च, पहाटे 3.27 वाजता – क्रू-9 फ्लोरिडाच्या समुद्र किनाऱ्याजवळ उतरले. यान समुद्रात स्थिरावल्यानंतर स्पेसएक्सच्या बचाव पथकाने तत्काळ पुढील कार्यवाही सुरू केली.