
महाराष्ट्रासारखे राज्य दंगलीत होरपळले तर सगळ्यांचेच नुकसान होईल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना 1925 साली झाली. तेव्हापासून ‘संघा’ला औरंगजेबाच्या कबरीवर आवाज उठवावा असे का वाटले नाही? पेशव्यांनी 1713 ते 1818 पर्यंत राज्य केले. औरंगजेबाची कबर त्यांनाही हटवता आली असती; पण पेशव्यांनीही ते केले नाही. मात्र आठ लाख कोटींच्या कर्जाखाली दबलेल्या महाराष्ट्राने ‘कबर’ उखडण्याला प्राधान्य दिले. महाराष्ट्राची इतकी वाताहत कधीच झाली नव्हती. दंगल घडवली कोणी आणि खापर ‘छावा’वर फुटले!
नागपूरच्या दंगलीचे खापर मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘छावा’ चित्रपटावर फोडले हे त्यांचे मनोबल कमजोर असल्याचे लक्षण आहे. दंगलीच्या गुन्हेगारांना सोडणार नाही, असे त्यांनी जाहीर केले. म्हणजे ते काय करणार? ‘छावा’ चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, औरंगजेबाची भूमिका करणारे नट यांच्यावर खटले दाखल करणार काय? कारण ‘छावा’मुळे दंगल झाली. आता या ‘छावा’ चित्रपटाचे खास शो मुख्यमंत्र्यांनीच ठेवले होते. भाजप व संघ मंडळातर्फेही ‘छावा’चा प्रचार सुरूच होता. ‘छावा’च्या शेवटी छत्रपती संभाजीराजांना औरंगजेबाने निर्घृणपणे मारल्याचे दृष्य भावना भडकवणारे आहे. संभाजीराजांना औरंगजेबाने क्रूरपणे मारले, संभाजी महाराजांनी धर्मासाठी बलिदान दिले, पण औरंगजेबापुढे ते झुकले नाहीत हा इतिहास महाराष्ट्राला ज्ञात आहे. जेथे संभाजीराजांची हत्या झाली तेथे स्मारक आहे. यावर ग्रंथ, पुस्तके, कादंबऱ्या आहेत. पण ते वाचून दंगली भडकल्या व लोक कुदळ-फावडी घेऊन औरंगजेबाची कबर खोदायला निघाले असे कधी घडले नाही. संघाचे श्री. गोळवलकर गुरुजी आणि वीर सावरकरांनी त्यांच्या लिखाणात संभाजीराजांविषयी बरे म्हटलेले नाही. तरीही लोकांनी दंगली केल्या नाहीत. मग एक चित्रपट पाहून लोकांनी दंगली का कराव्यात? मोदी काळात पाकिस्तानने पुलवामा घडवून चाळीस जवानांची क्रूर हत्याच केली. चीननेही लडाख प्रांतात आपल्या सैनिकांचे शिरकाण केले. तरीही देशात पाकिस्तान किंवा चीनविरुद्ध संतापाचा स्फोट घडून दंगली उसळल्या नाहीत व विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे वीर कुदळ-फावडी घेऊन पाकड्यांचा तंबू उखडायला बाहेर पडले नाहीत. पुलवामा घडले तेव्हा तर नरेंद्र मोदी हे जिम कार्बेट
जंगलात ‘सफारी’चा
आनंद घेत होते व त्यांचेही रक्त उसळले नाही. मग एक चित्रपट पाहून भाजप समर्थकांनी दंगली का भडकवाव्यात? दंगा पूर्वनियोजित होता असे सांगणे हे स्वतःच्या नाकर्तेपणावर शिक्कामोर्तब करण्यासारखेच आहे. नागपुरातील दंगा कुराणाची आयत लिहिलेली चादर जाळल्यामुळे झाला. इन्स्टाग्राम व इतर समाजमाध्यमांवर या जळत्या चादरीचा व्हिडीओ व्हायरल होत असताना नागपूरचे पोलीस काय करत होते? त्यांनीच वेगाने हालचाल का केली नाही? पोलीस थंड बसले होते. ही गृह खात्याची नामुष्की आहे. ‘‘पोलिसांनो, थंड बसा. मुसलमानांची डोकी भडकून ते रस्त्यावर उतरू द्या,’’ असे कुणाचे आदेश होते काय? परखड बोलायचे तर भारतीय जनता पार्टीची नियत साफ नसल्याने महाराष्ट्र पेटला आहे. माणसा-माणसांत, जाती-धर्मांत भांडणे लावून झाली. आता माणसे आणि थडग्यात युद्ध लावून भाजप टाळ्या वाजवत आहे. औरंगजेब सत्तेसाठी धर्माचा वापर करीत होता. आजचा भाजपदेखील तेच करीत आहे. धर्माचा वापर करून महाराष्ट्र पेटवायला ते निघाले आहेत. 1707 साली औरंगजेब याच मातीत मेला. 2025 साली भाजपच्या लक्षात आले की, 14 रुपयांत बनलेले हे थडगे देशासाठी धोकादायक आहे. या औरंग्याचा जन्म गुजरातमध्ये झाला. तो महाराष्ट्र काबीज करण्यासाठी आला व येथेच त्याचे थडगे बांधले. भाजप समर्थक औरंग्याच्या कबरीवरून दंगल पेटवत असताना महाराष्ट्रातील एका शिक्षकाने आत्महत्या केली. त्याला 18 वर्षे वेतन मिळाले नाही. शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करीत आहेत, त्याच वेळी भाजपचे मोदी सरकार श्रीमंतांची
लाखो कोटींची कर्जे
माफ करीत सुटले आहे. श्रीमंतांना हे दान द्यायचे व गरीबांच्या पोरांना हिंदू-मुसलमान खेळात उद्ध्वस्त करायचे. चीन 140 मीटर उंच काचेचा पूल बनवत आहे, चंद्रावर ‘रिसर्च सेंटर’ बनवत आहे, हायस्पीड ट्रेन चालवत आहे आणि भारतात काय, तर तरुणांना मशिदीखाली मंदिरे शोधण्याच्या कामाला लावले. त्यांच्या हाती मशिदींचे तळ खोदण्यासाठी कुदळ-फावडीच दिली आहेत. आता बोनस म्हणून औरंगजेबाची कबर खोदण्याचेही काम दिले. भविष्याचा नरक करून तरुणांना बरबाद करण्याचा डाव खतरनाक आहे. पंतप्रधान मोदी यांनी तरुणांच्या हाती कुदळ, फावडी आणि दगड दिले व त्याबद्दल त्यांच्या भक्तांना गर्व वाटत असेल. थडग्यातला औरंगजेबही यावर मनोमन हसत असेल. महाकुंभ कसा यशस्वी पार पडला यावर पंतप्रधान मोदींनी संसदेत भाषण दिले; पण देशाचे भविष्य रोज अंधकारमय होत आहे यावर ते बोलत नाहीत. महाराष्ट्रासारखे राज्य दंगलीत होरपळले तर सगळ्यांचेच नुकसान होईल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना 1925 साली झाली. तेव्हापासून ‘संघा’ला औरंगजेबाच्या कबरीवर आवाज उठवावा असे का वाटले नाही? पेशव्यांनी 1713 ते 1818 पर्यंत राज्य केले. औरंगजेबाची कबर त्यांनाही हटवता आली असती; पण पेशव्यांनीही ते केले नाही. मात्र आठ लाख कोटींच्या कर्जाखाली दबलेल्या महाराष्ट्राने ‘कबर’ उखडण्याला प्राधान्य दिले. महाराष्ट्राची इतकी वाताहत कधीच झाली नव्हती. दंगल घडवली कोणी आणि खापर ‘छावा’वर फुटले!