आभाळमाया – प्रदीर्घ प्रतीक्षा संपली!

>> वैश्विक, [email protected]

नऊ महिन्यांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपली. 2024 च्या जून महिन्यात 5 तारखेला स्पेस स्टेशनवर दाखल झालेली सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर तिथे फार तर आठवडाभर राहणार होते. पण ‘आठवडा’ इतका लांबला की ही मंडळी आज येतील, उद्या येतील करता करता तब्बल छत्तीस-चाळीस आठवडे उलटले!

…पण शेवट गोड झाला. काल पहाटे साडेतीनच्या सुमारास सुनीता आणि बुच यांना घेऊन येणारी ‘कॅप्सुल’ रीतसर तीन पॅरॅशूट उघडून अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्याजवळच्या टलाहासी या राजधानीलगतच्या पूर्व समुद्रात सुखरूप उतरली. या ‘अवतरणा’कडे जगातल्या कोटय़वधी लोकांच्या नजरा लागल्या होत्या. त्याचक्षणी तो जल्लोष (जागरण करत) टीव्हीवर पाहताना आपण ‘वैश्विक’ असल्याची सुखद जाणीव झाली. ‘नासा’मधील संशोधकांचा आनंद तर अंतराळात मावत नव्हता. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोरचं स्वागत समस्त पृथ्वीवासी माणसांकडूनच झालं! त्यांचा 17 तासांचा प्रवास यशस्वी ठरला. या दोघांना मोठय़ा नौकेवर आणण्यासाठी तीन छोटय़ा मोटरबोट वेगाने डायव्हिंग कॅप्सुलकडे निघाल्या. हळूहळू त्या तरंगत्या भव्य कॅप्सुलला भिडल्या. या ‘ड्रगन’ नावाच्या कॅप्सुलमध्येच हे अंतराळयात्री होते. एक मोटरबोट जवळ येताच त्यावरचा प्रशिक्षित तज्ञ चटकन उडी मारून कॅप्सुलला बाहेरच्या बाजूला असलेल्या ‘खाचेत’ उभा राहिला आणि कॅप्सुल मोठय़ा नौकेकडे खेचत नेण्यासाठी दोर बांधण्याची प्रक्रिया सुरू झाली. अखेर ड्रगन डायव्हिंग कॅप्सुल मोठय़ा नौकेजवळ येताच क्रेनद्वारा उचलून नौकेवर ठेवण्यात आली.

अंतराळातून पृथ्वीवर… पण समुद्रात हे अवतरण झालं. अजूनही अंतराळयात्री ‘तरंगत्या’ अवस्थेतच होते, पण त्यांचे पाय भूमीवर स्थिरावण्यासाठी थोडा वेळ लागणार. त्यांची वैद्यकीय चाचणी झाल्यावर ही मंडळी पुन्हा आपल्या सहकाऱ्यांना, कुटुंबीयांना भेटतील. माणसांच्या जगात येतील. हा सारा थरार त्याचक्षणी अनुभवण्याचं समाधान काही निराळंच होतं. या चार अंतराळयात्रींची ‘ग्रह’ वापसी हीच ‘गृह’ वापसी ठरलीय. त्यांचा अंतराळातला नऊ महिन्यांचा आकस्मिक ‘वाढीव’ निवास कसा होता? तिथे अडकल्यापासून ते पृथ्वीवर परतण्यापर्यंतचा ‘थरार’ आणि अंतराळस्थानकात राहून या दोघांनी स्थिरचित्ताने केलेले वैज्ञानिक प्रयोग याची माहिती पुढच्या लेखात घेऊया.

1983 मध्ये विज्ञानाची पदवीधारक झालेल्या साहसी सुनीताला 1987 मध्ये अमेरिकन नौदलात नोकरी मिळाली. त्यानंतर नेव्हल एअर ट्रेनिंगकडे वळल्या. मुळात ‘डायव्हिंग’ अधिकारी म्हणून निवड झालेल्या विल्यम्स यांनी नौदलाच्या हवाई उड्डाणातही प्रावीण्य प्राप्त केलं. हेलिकॉप्टर कॉम्बॅट स्क्वॅड्रनमध्ये त्यांचा समावेश झाला.

पायलट झाल्यावर 30 प्रकारच्या विमानांतून 3000 ‘फ्लाइट अवर्स’ त्यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केले. त्यानंतर त्यांच्या कारकीर्दीला कलाटणी मिळाली. अमेरिकन अंतराळ अभ्यास संस्था असलेल्या ‘नासा’साठी त्यांची 1998 मध्ये निवड झाली. ही निवड किती योग्य होती ते त्यापुढच्या काळात दिसून आलं.

9 डिसेंबर 2006 रोजी ‘डिस्कव्हरी’ या स्पेस-शटलमधून 14 व्या अंतराळ मोहिमेत त्या सहभागी झाल्या. 2007 च्या 31 जानेवारीला तसेच 4 व 9 फेब्रुवारीला त्यांनी स्पेसवॉकचा अनुभव घेतला. स्पेसवॉक म्हणजे पृथ्वीला सुमारे 90 मिनिटांत एक परिक्रमा करणाऱ्या अंतराळ स्थानकाला जोडलेल्या अवस्थेत थेट मुक्त अंतराळातलं भ्रमण. हे करण्यासाठी विलक्षण साहस हवं. सुनीता विल्यम्स यांनी ते सिद्ध केलं. तिसऱ्या स्पेसवॉकच्या वेळी तर त्या तब्बल 6 तास 40 मिनिटे एवढा काळ अंतराळात ‘चालत’ (तरंगत) होत्या.

हे अंतराळातलं तरंगत चालणं कसं असेल त्याचे व्हिडीओ आहेत. अंतराळयात्री यानातही तरंगत्या अवस्थेतच असतात. तिथे जवळजवळ शून्य गुरुत्वाकर्षण (मायक्रोग्रॅव्हिटी) असल्याने प्रत्येक गोष्टीला वजनरहित अवस्था प्राप्त होते. अशा ठिकाणी कसं वावरायचं याचं प्रशिक्षण अंतराळयात्रींना पृथ्वीवरच्या कृत्रिम निर्वात पोकळीत देण्यात येतं. 2015 मध्ये अमेरिकेच्या व्यावसायिक स्पेस-फ्लाइटसाठी निवड झालेल्या पहिल्या काही अंतराळयात्रींमध्ये सुनीता यांचा क्रमांक होता. 18 एप्रिल 2022 रोजी बॅडी विल्मोर, सुनीता विल्यम्स आणि मायकेल फिन्क हे तीन अंतराळयात्री बोइंगच्या स्टारलायनरमधून अंतराळस्थानकावर जाऊ शकतील असं ‘नासा’ने जाहीर केले.

शेवटी 5 जून 2024 रोजी ‘स्टारलायनर’ सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना घेऊन अंतराळस्थानकाकडे निघालं. शेवटच्या टप्प्यात एका बूस्टरच्या गडबडीमुळे ‘डॉकिंग’चा किंवा अंतराळस्थानकाशी जोडणी करण्यातही धास्ती निर्माण झाली, परंतु सुनीताच्या नेतृत्वाखाली सर्व व्यवस्थित होऊन हे दोन अंतराळयात्री स्पेस स्टेशनवर पोचले. त्याक्षणी त्या उद्गारल्या, ‘पुन्हा घरी आल्यासारखं वाटतंय.’ परंतु सुनीताचं हे माहेरपण फारच लांबले. अवघ्या आठवडाभरासाठी गेलेले हे दोन अंतराळयात्री, ‘स्टारलायनर’ची सुखरूप ‘परत’ नेण्याची शाश्वती नसल्याने तिथेच अडकले.

… ते आज येतील उद्या येतील असं करता करता नऊ महिने गेले आणि अखेर स्पेसएक्सच्या क्रू 10 मोहिमेसाठी चार अंतराळयात्रींना घेऊन ड्रगन यान उडालं आणि चौघांना स्पेस स्टेशनवर ठेवून सुनीता विल्यम्स तसंच बुच (बॅरी) विल्मोर यांना घेऊन सुखरूप पृथ्वीवर परतलं. एक अस्वस्थ करणारी प्रतीक्षा संपली. पृथ्वीवासीयांना आनंद झाला… पण या काळात सुनीता आणि बॅरी यांनी विविध अंतराळी प्रयोगात भाग घेत जी ‘तितिक्षा’ म्हणजे सहनशीलता दाखवली त्याबद्दल त्यांना ‘हॅट्स ऑफ’ म्हणायला हवं!