
औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. याच मुद्द्यावरून नागपूरमध्ये दंगल उसळली. नागपूर मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असून इथूनच संघाचे कामकाज चालते. बंगळुरू येथे संघाच्या प्रवक्त्यांना ‘नागपूरमध्ये झालेली दंगल आणि औरंगजेब मुद्दा याबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय’ यासंदर्भात प्रश्न विचारला. त्यावर संघाने स्पष्ट भूमिका मांडत औरंगजेबाचा विषय आजच्या काळात सुसंगत नाही, असं म्हटलं आहे. संघाचे प्रवक्ते सुनील अंबेकर म्हणाले की, कोणत्याही प्रकारचा हिंसाचार हा समाज स्वास्थासाठी चांगला नाही. पोलिसांकडून या घटनेची दखल घेतली जात आहे. ते याच्या मूळाशी जातील. यानंतर औरंगजेबाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा प्रश्न विचारला असता आजच्या घडीला तो विषय सुसंगत नाही, असं उत्तर अंबेकर यांच्याकडून देण्यात आलं.
संघाच्या या उत्तरावर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. आरएसएसची भूमिका आम्ही त्यातले नाही, असे सांगणारी असून, हे उशिरा सूचलेलं शहाणपण आहे, असे नाना पटोले म्हणाले. घटना झालेली आहे. आरएसएसनेच आणलेलं सरकार आहे. आरएसएसने आणलेल्या सरकारमधील मंत्री धार्मिक तेढ निर्माण करत आहेत. मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांचे कान का टोचले नाहीत? महाराष्ट्र पेटल्यानंतर आता आम्ही त्यातले नाही, हे सांगणं चुकीचे आहे. हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.