नागपूरच्या दंगलीवर संघाने दिली प्रतिक्रिया, औरंगजेबाचा मुद्दा सध्या सुसंगत नाही!

Sunil Ambekar Akhil Bharatiya Prachar Pramukh RSS

औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. याच मुद्द्यावरून नागपूरमध्ये निदर्शने झाली. यानंतर वातावरण बिघडले, वादावादीचं रुपांतर दगडफेक आणि जाळपोळीत झालं. नागपूर मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असून इथूनच संघाचे कामकाज चालते. त्यामुळेच बंगळुरू येथे संघाच्या प्रवक्त्यांना ‘नागपूरमध्ये झालेली दंगल आणि औरंगजेब मुद्दा याबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय’ यासंदर्भात प्रश्न विचारला. त्यावर संघाने स्पष्ट भूमिका मांडत औरंगजेबाचा विषय आजच्या काळात सुसंगत नाही, असं म्हटलं आहे.

बंगळुरू येथे संघाची ‘अखिल भारतीय प्रतिनिधी सभा’ 21 ते 23 मार्च अशा तीन दिवसात होणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला ऑक्टोबर 2025 मध्ये 100 वर्ष पूर्ण होत आहे. याच कार्यक्रमाची माहिती देण्यासंदर्भात संघाची पत्रकार परिषद बोलण्यात आली होती. या पत्रकार परिषदेवेळी त्यांना महाराष्ट्रातील औरंगजेब कबरीचा मुद्दा आणि दंगली संदर्भात एक प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना संघाचे प्रवक्ते सुनील अंबेकर म्हणाले की, ‘कोणत्याही प्रकारचा हिंसाचार हा समाज स्वास्थासाठी चांगला नाही. पोलिसांकडून या घटनेची दखल घेतली जात आहे. ते याच्या मूळाशी जातील’.

यानंतर औरंगजेबाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा प्रश्न विचारला असता ‘आजच्या घडीला तो काळ सुगंत नाही’, असं उत्तर अंबेकर यांच्याकडून देण्यात आलं.