आम्ही अल्पमतात आहोत म्हणून आमचा गळा दाबण्याचा प्रयत्न करू नका, अनिल परब यांनी सत्ताधाऱ्यांना सुनावले

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांच्याविरोधात विरोधकांनी मांडलेला अविश्वासदर्शक ठराव सभापती राम शिंदे यांनी फेटाळून लावला होता. त्यानंतर आज प्रवीण दरेकर यांनी विधापरिषदेत गोऱ्हे यांच्यासाठी विश्वासदर्शक ठराव मांडला व तो तत्काळ मंजूरही झाला. त्यानंतर विरोधकांनी विधानपरिषदेत घोषणा देत या विश्वास दर्शक ठरावाचा विरोध केला. या दरम्यान विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी देखील बोलण्याची परवानगी मागितली मात्र सरकारने ती देखील नाकारली. त्यावरून संतापलेले आमदार अनिल परब यांनी सभागृहता बोलताना सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीकास्त्र सोडलं.

”आज जो लोकशाहीचा खून झाला त्याचा निषेध करण्यासाठी मी इथे उभा आहे. आज जो उपसभापतींवर विश्वासदर्शक ठराव मांडला गेला. आम्हाला माहिती हवी कुठल्या नियमाने हा प्रस्ताव दाखल केला गेला. या सभागृहाची संस्कृती पंरपरा आहे. कुठल्या नियमाने हा प्रस्ताव मांडला गेला. इथे कायदे बनले जातत त्या सभागृहातच कायद्याची पायमल्ली होत असेल, पायदळी तुडवले जात असतील तर इथे येण्याचं प्रयोजन काय? नियमांच्या पुस्तकातील कुठल्या नियमाप्रमाणे तो विस्वासदर्शक ठराव प्रस्ताव मांडला, कुठल्या नियमांनी तो पारित केला. आम्ही पोल मागितला तो आम्हाला दिला नाही. आम्हाला आमचे मत मांडता आले नाही. आमच्या हक्कांवर गदा आली आहे. तो ठराव कुठल्या नियमाने आणला तो सांगा. नियम 11 मध्ये रिमूव्हलची प्रोसेस आहे. नियम 23 मध्ये प्रस्ताव दाखल करू शकतो. प्रस्ताव दाखल केल्याचे देखील काही नियम आहेत. तुमच्याकडे एवढी जर बहुमत आहे, त्याचा जर सरकारला माज असेल तर त्यांनी तो मतदानाने सिद्ध करून दाखवावा. कामकाजात घ्या. मतदान घडवून घ्या. सभापतींच्या जोरावर, केवळ आम्ही अल्पमतात आहोत म्हणून आमचा गळा दाबण्याचा प्रयत्न करू नका. आज जे झालं ते गळा दाबण्याचा प्रयत्न झालाय. आज आमच्याकडे अल्पमत असेल, तुमच्याकडे बहुमत आहे. मतदानाचा हक्क आहे. मतदान करून तुमच्या उपसभापतींवर विश्वास दाखवू शकला असता. आज आपण जो ठराव मांडला आहे तो मांडून तुम्ही चुकिचा पायंडा पाडला आहे. आम्ही सरकारचा निषेध करतो. या निर्णयाविरोधात कोर्टात जाता येत नाही त्याचा आधार घेऊन तुम्ही हवं तसं कामकाज करू शकत नाही. विरोधी पक्ष नेत्याचा आवाज दाबला जातोय. विरोधी पक्ष नेत्याच्या पदाला घटनात्मक दर्जा आहे. त्या दर्जाची देखील आपण मायमल्ली करताय. एक तास ते उभे होते त्यांना देखील आपण बोलू दिले नाही. या सभागृहाचे काही नियम, संस्कृती आहे, ते सगळं पायदळी तुडवून त्याचा आम्ही निषेध करतो”, असे अनिल परब म्हणाले.