
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिने उलटूनही अद्याप या प्रकरणातील एक आरोपी संतोष आंधळे हा पोलिसांच्या हाती लागलेला नाही. या प्रकरणावर बोलताना शिवसेना नेते, आमदार भास्कर जाधव यांनी राज्य सरकारला फटकारले आहे.
”मी खूप आधीच हे सांगितले होते की संतोष देशमुखच्या हत्याऱ्यांना शिक्षा होणार नाही, सर्व मारेकरी सापडणार नाही. इथे फक्त चौकश्या सुरू आहेत. एसआयटी चौकशी, सीबीआय चौकशी. चौकश्यांच्या फेऱ्यात आरोपींना संरक्षण देण्याचं काम होईल हे मी आधीच सांगितलं होतं. आताही बघा दुसरा एक आरोपी आहे त्याच्या घरावर बुलडोजर फिरवला जातोय. परंतू या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड व इतर आरोपींच्या घरावर सरकार बुलडोजर फिरवत नाहीए. याचा अर्थ संतोष देशमुखांची हत्या सरकार गंभीर घटना मानत नाही.”, असे भास्कर जाधव म्हणाले.
”नागपूरमध्ये महिला पोलिसाचा ज्याने कुणी विनयभंग केला त्याचा शोध घेऊन त्याला शिक्षा झालीच पाहिजे ही माझी मागणी आहे. ज्यांनी पोलिसांवर हल्ले केले त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. परंतू अशाप्रकारचा महिला पोलिसांचा विनयभंग व्हावा, असे हल्ले व्हावे असे हे वातवारण कुणी निर्माण केलं. याचा सरकार शोध घेणार आहे की नाही. गुन्हेगारला शिक्षा देतो कारण त्याने गुन्हा केलाय मात्र त्याला गुन्हा करायला कुणी लावलं ते देखील शोधलं पाहिजे. जेवढा हल्ला करणारा गुन्हेगार शिक्षेस पात्र आहे. तेवढा गुन्हा करायला लावणाराही दोषी आहे. त्यामुळे सरकारने अशा प्रकारे जो कुणी दोषी असेल त्या सर्वांना एकाच तराजूत तोलून त्या सर्वांच्यावर समान कारवाई करावी अशी माझी मागणी आहे”, असेही त्यांनी यावेळी सांगितले.