
मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदवीर अशोक सराफ यांची ओळख वेगळी करुन देण्याची गरज नाही. अशोक सराफ यांनी नुकतेच इन्स्टाग्रामच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या जगात पाऊल ठेवले आहे. आता आपल्या लाडक्या अशोक मामांविषयी अनेक घडामोडी आपल्याला इन्स्टाग्रामच्या माध्यमातून मिळणार आहेत. सध्याच्या घडीला अशोक सराफ हे 77 वर्षांचे आहेत, तरीही त्यांच्या अभिनयामध्ये आजही तितकीच उर्जा पाहायला मिळते.
गेली कित्येक वर्षे अशोक सराफ आपल्या अभिनायाच्या जोरावर प्रेक्षकांचे मनोरंजन करत आलेले आहेत. 80-90 या दशकांमध्ये अशोक सराफ यांनी विनोदाच्या माध्यमातून प्रेक्षकांना हसवले होते ते अगदी आजतागायत हसवत आहेत.
इन्स्टाग्रामवर त्यांनी अकाऊंट ओपन केल्यानंतर, त्यांनी स्वतः याची माहिती त्यांच्या चाहत्यांना दिली. ashoksaraf_Official असे त्यांच्या इन्स्टाग्राम हॅंडलचे नाव असून हे त्यांचे आॅफिशीयल अकाऊंट आहे. या नवीन अकाऊंटवरूनच अशोक मामांनी त्यांच्या ‘अशी ही जमवा जमवी’ या नव्या चित्रपटाचा टीझरही टाकला आहे. अशोक सराफ यांचे अकाऊंट क्रिएट झाल्यानंतर, अशोक सराफ यांना त्यांच्या चाहत्यांनी लगेच फाॅलो केले. चाहत्यांसोबत मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनीही मामांना फाॅलो केलेलं आहे.
‘अशी ही बनवा बनवी’, ‘धुमधडाका’, ‘बिनकामाचा नवरा’, ‘नवरा माझा नवसाचा’, ‘चौकटराजा’ अशा विविधांगी सिनेमांमध्ये त्यांच्या भूमिका चांगल्याच गाजल्या होत्या. अशोक सराफ यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतही स्वतःच्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. अशोक सराफ यांची गाजलेली हिंदी मालिका ‘हम पाच’ आजही प्रेक्षकांच्या चांगलीच स्मरणात आहे.