
गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील डोणगाव रोडवरील हनुमान मंदिर येथील सेवानिवृत्त शिक्षक पमुसिंग छगनसिंगग पपैया (64) हे 13 मार्च रोजी राहत्या घरी पाण्याच्या हौदात पडले. त्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. शिक्षकाचा मृत्यू हौदात पडून झाला की खून झाला याबाबत ग्रामस्थांमध्ये उलटसुलट चर्चा होती. या प्रकरणी मूलबाळ होत नसल्यामुळे शिक्षकाच्या मनोरुग्ण पत्नीने त्यांच्या डोक्यात दगड घालून खून केल्याचे उघडकीस आले आहे.
शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश खटाणे, पो.कॉ. हनुमंत सातपुते, अर्जुन तायडे यांनी निवृत्त शिक्षकांच्या खुनाला पाच दिवसात वाचा फोडली. भौतिक पुराव्यावरून तपास केला. निवृत्त शिक्षकांच्या खुनाच्या संशयाची सुई मनोरुग्ण असलेल्या पत्नीभोवती फिरत होती. शिल्लेगाव पोलिसांनी मयताच्या मनोरुग्ण पत्नीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता भारती पमुसिंग पपैया (51) हिने पतीच्या खुनाची कबुली दिली.
लग्न झाल्यापासून मुलबाळ होत नव्हते म्हणून आमच्यात कायम खटके उडायचे व सतत भांडणे व्हायचे तसेच कडाक्याचे भांडण घटनेच्या दिवशी झाले. रात्री पलंगावर झोपेत असलेल्या पतीच्या डोक्यात दगड घालून खून केला व त्यानंतर कोणाला खुनाचा संशय येऊ नाही म्हणून त्याचा मृतदेह घरातच असलेल्या पाण्याच्या हौदात टाकला, अशी माहिती शिल्लेगाव पोलिसांनी दिली आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपी पत्नी भारती पपैया हिला बेड्या ठोकल्या. आरोपीस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीची हसूल कारागृहात रवानगी केली.