भाईंदरच्या मेट्रो कारशेडसाठी १० हजार झाडांची कत्तल! पर्यावरणप्रेमींमध्ये संतापाची लाट; नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात

मीरा-भाईंदरमध्ये मेट्रोची कामे सध्या जोरात सुरू असून डोंगरी येथे भव्य कारशेड उभारण्यात येणार आहे. त्यासाठी ११ हजार ३०६ झाडांवर लवकरच कुऱ्हाड पडणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर झाडे तोडणार असल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली असून नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. हजारो झाडे तोडणार असले तरी त्यातील काही झाडांचे पुनर्रोपण करण्याचा दावा पालिकेने केला आहे. पण प्रत्यक्षात नेमकी किती झाडे वाचवणार, त्यांचे संगोपन कोण करणार याची कोणतीही खात्री नाही. या कत्तलीमुळे मीरा भाईंदरमधील पर्यावरणाचा ऱ्हास होणार आहे.

ठाणे जिल्ह्यात मेट्रोद्वारे ठाणे, कल्याण, भिवंडी, मीरा रोड, तळोजा ही शहरे एकमेकांना जोडण्यात येणार आहेत. घाटकोपर ते कासारवडवलीदरम्यान धावणारी मेट्रो पुढे गायमुखपर्यंत जाणार असून त्यानंतर ही मेट्रो मीरा-भाईंदरकडे नेण्याचे काम सुरू आहे. भाईंदरपासून ९ किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगरी भागात मेट्रोचे मोठे कारशेड उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी भाईंदर पश्चिमेकडील राधास्वामी सत्संग परिसर आणि मुर्धा ते मोरवा गावदरम्यान असलेल्या मोकळ्या जमिनीवर कारशेडसाठी आरक्षण टाकले होते. मात्र तेथे कारशेड न उभारता डोंगरी येथे कारशेड उभारले जाणार आहे. तेथील जमीन एमएमआरडीएला हस्तांतरित केली असून आता ११ हजार ३०६ झाडे तोडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

■ डोंगरी येथील मेट्रो कारशेडसाठी यापूर्वी १ हजार ४०६ झाडे तोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावर काही जणांनी आक्षेपही घेतला. आता नव्याने ९ हजार ९०० झाडे तोडण्याचा प्रस्ताव असून त्यासाठी हरकती व सूचना मागवल्या आहेत.
■ मीरा-भाईंदर महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण अधिकारी कांचन गायकवाड यांनी झाडे तोडण्याबाबतची सूचना जारी केली असून पर्यावरणप्रेमी या प्रस्तावाला विरोध करण्याची शक्यता आहे.
■ डोंगरी हा भाग लहान मोठ्या डोंगरांनी व्यापला असून तेथे मोठमोठे वृक्ष आहेत. त्यात काही औषधी झाडेदेखील आहेत. हजारो झाडांची कत्तल होणार असल्याने येथील निसर्ग संपत्तीचा मोठ्या प्रमाणावर हास होणार आहे.