
सरकार चालवता येत नसल्याने राज्यात दंगली घडवल्या जाताहेत, भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्राचा मणिपूर करायचाय, असा जोरदार हल्ला शिवसेना विधिमंडळ पक्षनेते आदित्य ठाकरे यांनी आज महायुती सरकारवर केला. महाराष्ट्रात येणारे उद्योग आणि गुंतवणूक अशी अस्थिरता निर्माण करून गुजरातला पळवायचे असा भाजपचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला.
विधान भवन आवारात आदित्य ठाकरे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नागपूर दंगलीबाबत प्रतिक्रिया दिली. राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याच शहरात दंगल घडणे हे दुर्दैवी आहे, दंगल पेटली असताना पोलीसच उशिरा पोहोचले असे स्थानिकांचे म्हणणे आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. अशा घटना घडू शकतात याचा गुप्तचर अहवाल मुख्यमंत्र्यांकडे यायला हवा होता, असे ते म्हणाले.
महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर बीड, परभणी, पुणे येथे अनेक दुर्दैवी घटना घडल्या आहेत. त्याची माहिती मीडियातून मिळते, मात्र मुख्यमंत्री कार्यालयाला याची माहिती मिळते की नाही? सरकारची गुप्तचर यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा यांना काही माहिती असते की नाही? असा प्रश्न आता उपस्थित होतोय, असेही आदित्य ठाकरे म्हणाले. बेरोजगारी, महागाई, शेअर बाजारातील घसरण, मुंबईतील पाणीटंचाई यावर उपाययोजना करता येत नसल्यामुळेच 300-350 वर्षांपूर्वीचा मुद्दा उकरून जनतेला भांडत ठेवले जात आहे, याकडेही आदित्य ठाकरे यांनी माध्यमांचे लक्ष वेधले. यावेळी विधानसभेतील गटनेते भास्कर जाधव, आमदार वरुण सरदेसाई, बाळा नर, नितीन देशमुख उपस्थित होते.
मिंध्यांकडून दंगल पेटवण्याचा प्रयत्न
आदित्य ठाकरे यांनी यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही हल्लाबोल केला. कुठे ना कुठे आणखी ठिणगी पडावी यासाठी एकनाथ शिंदे यांच्याकडून लावालावी, पेटवापेटवी सुरू आहे, असे ते म्हणाले. नागपूर दंगलीबाबत मुख्यमंत्र्यांनी निवेदन केल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी त्यावर पुन्हा बोलण्याची गरज नव्हती, असे ते पुढे म्हणाले.
कबर हटवायचीय तर पंतप्रधानांना सांगा
केंद्र आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. औरंगजेबाची कबर खोदायची, जाळायची आहे तर पंतप्रधानांना जाऊन सांगा, पण तसे न करता तरुणांना हिंसाचारात अडवण्याचा भाजपचा डाव आहे. स्वतःच्या मुलांना परदेशात स्थायिक करून इथल्या तरुणांची माथी भडकावण्याचे काम भाजप नेते करत आहेत, असे ते म्हणाले.