तेलंगणात ओबीसींना 42 टक्के आरक्षण

महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद पेटलेला असताना आणि न्यायालयाने 50 टक्क्यांची मर्यादा घालून दिलेली असतानाच दुसरीकडे तेलंगणात शिक्षण, नोकरी, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी म्हणजेच इतर मागासवर्गीयांना 42 टक्के आरक्षण देणारे विधेयक आज विधानसभेत मंजूर करण्यात आले. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या सरकारने सादर केलेल्या विधेयकाला चर्चेनंतर आवाजी मतदानाने मंजुरी देण्यात आली. तेलंगणातील काँग्रेस सरकारने आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांवरून 70 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय आज घेतला.

क्रांतिकारी निर्णय – राहुल गांधी

तेलंगणा सरकारच्या निर्णयाला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी क्रांतिकारी निर्णय म्हटले आहे. एक्सवरून केलेल्या पोस्टद्वारे त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जातनिहाय जनगणनेद्वारेच मागासवर्गीय आणि वंचितांना त्यांचे हक्क मिळू शकतात, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.