इंग्लंड दौऱ्यावर रोहितच कर्णधार असेल, शालेय प्रशिक्षक दिनेश लाड यांचा विश्वास

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या महत्त्वाकांक्षी मालिकेत दारुण पराभव पत्करावा लागल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा आपल्या नेतृत्वाचा राजीनामा देईल तसेच कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीही जाहीर करेल, असे संकेत मिळत होते, मात्र असे काहीच घडले नाही. त्याचप्रमाणे चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर रोहित वन डे क्रिकेटलाही मानाने अलविदा करेल, असे भाकित सर्वांनी वर्तवले होते, पण चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतरही त्याने आपण निवृत्त होणार नसल्याचे स्पष्ट केले. या जेतेपदानंतर रोहितचा आत्मविश्वास दुणावला असून त्याची वन डे कारकीर्द 2027 च्या वर्ल्ड कपपर्यंत बहरेल. एवढेच नव्हे तर आगामी इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतही रोहितच हिंदुस्थानी संघाचा कर्णधार असेल, असा विश्वास रोहित शर्माचे शालेय क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांनी व्यक्त केला आहे.

नुकत्याच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांपैकी तीन कसोटींत रोहित शर्माने नेतृत्व सांभाळले होते आणि या तिन्ही कसोटींत हिंदुस्थानी संघाची कामगिरी निराशाजनक झाली होती. या तीन कसोटींत रोहित पूर्णपणे अपयशी ठरला होता आणि त्याने 3, 6, 10, 3, 9 अशा पाच डावांत 31 धावा केल्या होत्या. या मालिकेपूर्वी न्यूझीलंडविरुद्धही 2, 52, 0, 8, 18, 11 अशा अपयशी खेळ्या त्याने केल्या होत्या. या लाजीरवाण्या कामगिरीनंतर रोहितवर निवृत्तीसाठी चोहोबाजूंनी जोरदार टीकास्त्र सोडले गेले, पण रोहितने हे सारे अपयश गिळले आहे.

रोहितला हिंदुस्थानला वन डे वर्ल्ड कप जिंकून द्यायचे आहे. 2023 मध्ये हिंदुस्थानात झालेला वर्ल्ड कप रोहितचा संघ सलग दहा विजयानंतर हरला होता. हा पराभव जिव्हारी लागणारा होता. मात्र रोहितला ते अपयश धुऊन काढायचेय. त्यामुळे त्याची वन डे कारकीर्द 2027 पर्यंत नक्कीच असेल आणि जे 2003 मध्ये सौरभ गांगुलीच्या टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेत जमलं नव्हतं ते 2027 मध्ये रोहितची टीम इंडिया करून दाखवेल, असा विश्वासही दिनेश लाड यांनी बोलून दाखविला.

रोहितची कसोटी कारकीर्द

लाल चेंडूच्या कसोटी क्रिकेटमध्ये रोहितची बॅट अपेक्षित तळपली नाही. पदार्पणातच रोहितने 177 आणि ना. 111 धावांची खेळी केली, पण त्यानंतर तो कसोटी फलंदाज म्हणून फारसा यशस्वी ठरला नाही. परिणामता त्याला 12 वर्षांच्या कसोटी कारकीर्दीत केवळ 67 कसोटीच खेळता आल्या आहेत आणि यात आतापर्यंत त्याने 41 धावांच्या सरासरीने फक्त 4307 धावा केल्या आहेत. यात 12 शतकांचा समावेश. गेल्या मोसमात 8 कसोटींत 10.93 धावांच्या सरासरीने फक्त 164 धावा. यात 52 हे एकमेव अर्धशतक.

कसोटी कारकीर्दीचा निर्णय इंग्लंड दौऱ्यानंतरच

कुणी काहीही अंदाज लावो किंवा टीका करो, जूनमध्ये रोहितच्याच नेतृत्वाखाली हिंदुस्थानचा संघ पाच कसोटींसाठी इंग्लंडमध्ये दाखल होईल. या मालिकेनंतर रोहित आपल्या कसोटी क्रिकेटबाबत निर्णय घेऊ शकतो. इंग्लंडमध्ये त्याची बॅट तळपली आणि हिंदुस्थानला चांगले यश लाभले तर वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात होणाऱ्या मालिकेतही रोहित दिसू शकतो, असे लाड म्हणाले.