भाजप म्हणते, हे शिवाजी आमचे नव्हेत! नरेंद्रे मोदी हेच आमचे छत्रपती

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी करून भाजपने पुन्हा एकदा शिवरायांचा अवमान केला आहे. नरेंद्र मोदी हे गेल्या जन्मी छत्रपती शिवाजी महाराज होते, असे अकलेचे तारे भाजपचे ओडिशातील खासदार प्रदीप पुरोहित यांनी भर संसदेत तोडले. अखंड हिंदुस्थानला वंदनीय असलेले शिवराय भाजपला मान्य नाहीत हेच यातून अधोरेखित झाले असून पुरोहित यांच्या विधानाचा सर्वत्र तीव्र निषेध होत आहे.

हेच आमचे छत्रपती!

नरेंद्र मोदी हेच आमचे छत्रपती आहेत, असा प्रदीप पुरोहित यांचा सूर होता. पुरोहित म्हणाले, मी गिरीजाबाबा नावाच्या संताला भेटलो. तेव्हा त्यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी हे त्यांच्या मागील जन्मात छत्रपती शिवाजी महाराज होते. मोदींचा हा दुसरा जन्म आहे, महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला विकास आणि प्रगतीकडे नेण्यासाठी त्यांनी पुनर्जन्म घेतला आहे.’

शिवसेनेने लोकसभेत केला भाजपचा धिक्कार

प्रदीप पुरोहित यांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद लोकसभेत उमटले. शिवसेना खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, संजय जाधव, राजाभाऊ वाजे, संजय दिना पाटील यांनी अध्यक्षांसमोरील मोकळय़ा जागेत येऊन भाजप आणि पुरोहित यांचा धिक्कार केला.