IPL T20 Match – शार्दुल ठाकूर, शिवम मावीला लागणार लॉटरी

लक्ष्मीचा वरदहस्त लाभलेल्या आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ होण्यासाठी जेमतेम तीन दिवस उरलेत. या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर सर्व संघांची मोर्चेबांधणी सुरू केलीय, मात्र लखनौ सुपर जायंट्सला दुखापतीचे ग्रहण लागल्याने या संघात कोणत्या गोलंदाजांना खेळवायचे हेच अद्याप ठरलेले नाहीये. मयंक यादव, मोहसीन खान, आकाश दीप व आवेश खान या गोलंदाजांच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह असल्याने लखनौच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे या संघाच्या सराव शिबिरात असलेल्या शार्दुल ठाकूर व शिवम मावी या अष्टपैलू खेळाडूंना लखनौ संघात खेळण्याची लॉटरी लागू शकते.

रिटेक केलेला मयंक यादव व आकाश दीप हे सध्या बंगळुरूमध्ये राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (एनसीए) फिटनेसवर काम करत आहेत. मयंकने गोलंदाजीला सुरुवात केलीय, पण तो अद्यापि पूर्णतः फिट झालेला नाहीये. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर झालेल्या पाठीच्या दुखापतीतून आकाश दीपही अजून सावरलेला नसून तो सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. आवेश खान दुखापतीतून सावरला असला तरी तो अद्यापि लखनौच्या संघात दाखल झालेला नाहीये. मोहसीन खानच्या पोटरीचा स्नायू काही दिवसांपूर्ण दुखावला होता. त्यामुळे या चार गोलंदाजांना संघात ठेवण्याची जोखीम पत्करायची की नाही याबाबत लखनौच्या संघव्यवस्थापनात विचारमंथन सुरू आहे.

शार्दुल ठाकूर व शिवम मावी हे दोन प्रतिभावान गोलंदाज सध्या लखनौच्या संघात सरावासाठी आहेत. या दोघांनाही आयपीएलच्या लिलावात कोणीच खरेदी केलेले नाहीये. त्यामुळे या दोघांना संघात घेण्यासाठी लखनौच्या व्यवस्थापनात जोरदार चर्चा सुरू आहे. या दोन्ही खेळाडूंकडे देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलचाही अनुभव आहे. वेगवान गोलंदाजीसह हे दोघेही तुफानी फलंदाजीही करू शकतात. शार्दुलने तर नुकतीच झालेली रणजी ट्रॉफी आपल्या अष्टपैलू कामगिरीने गाजवलेली आहे. त्यामुळे अनफिट वेगवान गोलंदाजांपेक्षा शार्दुल व शिवमला संघात घेण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.