
यजमान न्यूझीलंडने पाकिस्तानचा दुसऱ्या टी-20 क्रिकेट सामन्यातही 5 फलंदाज आणि 11 चेंडू राखून धुव्वा उडवित सलग दुसरा विजय मिळविला. अचूक गोलंदाजी आणि अभेद्य क्षेत्ररक्षणानंतर टीम सिफर्ट व फिन ऍलन या सलामीच्या जोडीची फटकेबाजी ही न्यूझीलंडच्या विजयाची वैशिष्ट्ये ठरली. न्यूझीलंडने लागोपाठच्या विजयासह पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली.
पावसाच्या व्यत्ययामुळे 15-15 षटकांच्या झालेल्या या सामन्यात पाकिस्तानकडून मिळालेले 136 धावांचे लक्ष्य न्यूझीलंडने केवळ 13.1 षटकांत 5 बाद 137 धावा करून सहज पूर्ण केले. टीम सिफर्ट (45) व फिन ऍलन (38) यांनी 66 धावांची सलामी देत न्यूझीलंडला दमदार सुरुवात करून दिली. ऍलननेदेखील 15 चेंडूंत एका चौकारासह 5 टोलेजंग षटकार ठोकले. त्याआधी, पाकिस्तानने 15 षटकांत 9 बाद 135 धावसंख्या उभारली. कर्णधार सलमान आगाने सर्वाधिक 46 धावांची खेळी केली, तर शादाब खान (26) व तळाला शाहिन शाह आफ्रिदी (नाबाद 22) या दोन फलंदाजांनाच धावांची विशी ओलांडता आली.