महापालिका निवडणुकांआधी मतदार ओळखपत्रे आधारशी लिंक करा, शिवसेनेची राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी

महाराष्ट्रात येत्या काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्याआधी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार मतदार ओळखपत्रे आधारशी लिंक करून नव्याने मतदार याद्या प्रसिद्ध कराव्यात, अशी मागणी शिवसेनेने आज राज्य निवडणूक आयोगाकडे केली.

शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी याबाबत राज्य निवडणूक आयुक्त दिनेश  वाघमारे यांना पत्र लिहिले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयाचा हवाला या पत्रात त्यांनी दिला आहे. राज्यात महापालिका, नगर परिषद, नगर पंचायत, जिल्हा परिषद अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या काळात होणार असून त्या निवडणुकीला आज झालेला निर्णय लागू करण्यात यावा, अशी मागणी या पत्रात देसाई यांनी केली. नव्या नियमानुसार कार्यवाही करण्यात यावी व याद्या सुधारित करण्यात याव्यात, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

मतदार यादी शुद्ध होईल

पॅनकार्डप्रमाणे मतदार ओळखपत्र आधारशी लिंक करण्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला. याबाबत सर्वप्रथम शिवसेनेने आयोगाकडे मागणी केली होती. आयोगाच्या निर्णयाचे स्वागत करत यामुळे बोगस मतदारांना आळा बसेल तसेच दुबार आणि मयत मतदारांची नावे निघून मतदार यादी शुद्ध होईल, असा विश्वास सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.